इचलकरंजी : कोरोना महामारीच्या काळात आशासेविकांनी स्वत:सह आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे सेवा केली. मात्र, नगरपालिकेकडून गेल्या दहा महिन्यांपासून थकीत मानधन मिळालेले नाही. यामुळे संतप्त आशासेविकांनी नगराध्यक्षा दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. पालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने दिवाळीपूर्वी मानधन देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी बैठकीत दिले.
नगरपालिकेने कोरोना महामारीत आशासेविकांना गतवर्षीपासून घर टू घर सर्व्हेचे काम दिले होते. अद्यापही त्यांचे काम सुरू आहे. यावेळी सेवा बजावणाऱ्या ११६ सेविकांना महिन्याला तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. सततच्या पाठपुराव्याने गेल्यावर्षी सात महिन्यांचे मानधन मिळाले. मात्र, नोव्हेंबर २०२० पासून मानधन अद्याप मिळालेले नाही. शासनाकडून दिला जाणारा पगारही गेले चार महिने मिळाला नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटनेच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा दालनासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा दालनात लोकप्रतिनिधी व आशासेविकांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
यावेळी सेविकांचे प्रतिनिधी सदा मलाबादे यांनी शासनाकडून पगार मिळत नाही आणि १० महिन्यांचे मानधनही थकीत आहे. तर जगायचं कसे? वारंवार मागणी करूनही प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, असा सवाल उपस्थित केला. शासनाकडून १०० कोटींहून अधिक सहायक अनुदान येणे आहे. कोरोना महामारी आणि महापुरामुळे करवसुलीवर परिणाम झाल्याने विकासकामांची देयकेही बाकी आहेत. शासनाकडून अनुदान प्राप्त होताच थकीत मानधन देण्याचे आश्वासन उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी दिले. मात्र, दिवाळीपूर्वी मानधन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सेविकांनी दिला.
फोटो ओळी
०७०९२०२१-आयसीएच-०५
दहा महिन्यांपासून थकीत मानधन मिळाले नसल्याने इचलकरंजीतील आशासेविकांनी नगराध्यक्षा दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.