शिरोली : ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून कोल्हापूरच्या उद्योगवाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योजकांना दिले. शासकीय विश्रामगृह येथे उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत उद्योग विषयांवर चर्चा झाली.यावेळी उद्योजकांचे शिष्टमंडळ पवार यांच्याशी चर्चा करताना म्हणाले, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद याठिकाणी मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. तेथे उद्योगांची स्थिती चांगली आहे; पण कोल्हापूरला तसा अद्याप मोठा प्रकल्प आलेला नाही. सध्या मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. या ठिकाणच्या फौन्ड्री आणि इंजिनिअरिंग उद्योगांने फक्त सुटे भाग तयार करण्याचे काम केले आहे. येथील उद्योगांचा विस्तार होण्यासाठी आणि मंदीतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय गुंतवणूक असणारा मोठा प्रकल्प द्यावा. त्यामुळे येथील लघुउद्योगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दरम्यान, यावेळी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, गोशिमा, कोल्हापूर इजिनिअरिंग, कागल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्यावतीने नवीन उद्योग उभारण्यासाठी शासनाने भूसंपादन, फौन्ड्री उद्योगाला सवलती द्याव्यात, इतर राज्यांप्रमाणे वीज दरात सवलत देण्यात यावी, विमान सेवा सुरू करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या. यावेळी पवार म्हणाले, कोल्हापूरच्या उद्योजकांनी स्वत:च्या कर्तृत्वाने येथील उद्योग मोठे केले आहेत. ‘मेक इन इंडिया’चे नेतृत्व महाराष्ट्राकडे आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘मेक इन इंडिया’ सप्ताह होणार आहे. पंतप्रधान आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून कोल्हापूरला मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी फौन्ड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, गोशिमाचे अध्यक्ष देवेंद्र दिवाण, संचालक जयदीप चौगुले, अतुल पाटील, दीपक पाटील, डी. एन. कामत, शेखर कुसाळे, रामराजे बदाले, राहुल बुधले, टी. एस. घाटगे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2016 12:16 AM