इंदुमती गणेश--कोल्हापूर --रासायनिक संवर्धन प्रक्रियेवेळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवरून गायब करण्यात आलेल्या नागचिन्ह आणि शंख या चिन्हांची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या विषयावर योग्य ती कार्यवाही करावी, अशा आशयाचे पत्र शासनाकडून पुरातत्त्व खात्याला पाठविण्यात आले आहे. अंबाबाई मूर्तीवर जुलै २०१६ मध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. मात्र, या दरम्यान पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीच्या मस्तकावर नागचिन्ह घडविले नाही शंखही गायब केले. याबाबत विचारणा केली असता पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी श्रीपूजकांनी आमच्यावर दबाव आणला असा आरोप केला. अभ्यास करून मूर्तीवर अलंकारांसह अनेक चिन्ह नसतानाही ते घडविण्यात आले. नेमके नागचिन्ह का घडविले गेले नाही याचे उत्तर अजूनही पुजाऱ्यांनी आणि पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी दिलेले नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी माहितीच्या अधिकारात याबाबतची माहिती पुरातत्त्व खात्याकडे माहिती मागवली होती. त्यावर आठ महिन्यांनी पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीवर आधी नागचिन्ह नव्हते, असा खुलासा पाठविला होता. त्यानंतर तांबट यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली. त्यावर शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या अव्वर सचिव गीता कुलकर्णी यांनी १३ तारखेला मुंबईतील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मंडलच्या अधीक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्राची एक प्रत शरद तांबट यांना पाठविण्यात आली आहे. नागचिन्हाशिवाय मूर्ती द्या..अंबाबाई मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी आलेले पुरातत्त्वचे अधिकारी श्रीपूजकांसोबत शिल्पकार अशोक सुतार यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली मूर्ती पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी मूर्तीच्या मुद्रा, चिन्ह, ढालीची दिशा ही सगळी पाहणी केली छायाचित्रे घेतली नंतर मॉडेल म्हणून मूर्तीची मागणी करताना त्यांनी सुतार यांना नागचिन्ह काढून मूर्ती द्या, असे सांगितल्याने त्यावेळी ही मूर्ती देण्यात आली नव्हती, अशी माहिती एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
नागचिन्हाबाबत शासनाचे पुरातत्त्व खात्याला पत्र
By admin | Published: April 28, 2017 1:11 AM