कोल्हापूर : येथील पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामातील अडथळ्यांची शर्यत अद्याप संपली नाही. केंद्रीय पुरातत्त्व विभाग हे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित येत असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून विशेष बाब म्हणून पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळण्याबाबतचे पत्र केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याकडे सादर केले आहे. पर्यायी पुलाच्या आवश्यक पाच हजार चौरस फूट जागेवरील बांधकामासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपल्याने, तसेच वाहतुकीची कोंडी होत असल्याने येथे पर्यायी पुलाची उभारणी सुरू आहे. पर्यायी पुलाचे ८० टक्क्यांहून अधिक बांधकाम झाले आहे. तथापि, पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील जागा पुलाच्या मार्गात मुख्य अडथळे ठरत असल्याने गेले सात महिने हे बांधकाम थांबले आहे. या पर्यायी पुलाच्या बांधकामातील अडथळा ठरणारा जकात नाक्याची इमारत पाडली, तर तेरा झाडे पूर्वपरवानगीने तोडण्यात आली. पण, पाण्याचा हौद हा पुरातत्त्व खात्याच्या यादीत आहे की नाही याचा वाद अद्याप कायम राहिला आहे. तरीही शेजारी असणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील ब्रह्मपुरी टेकडी येत असल्याने या परिसरात सुमारे ३० मीटर आवारात खोदकाम करण्यास परवानगी नसल्याने हे पुलाचे काम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मुख्य अभियंता बामणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात सोमवारी जाऊन सचिवांंची भेट घेतल्याचे समजते. या सचिवांमार्फत केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्या कार्यालयाकडे विशेष बाब म्हणून या पर्यायी पुलाला मंजुरी मिळण्याबाबतचे पत्र सादर केले. त्यामुळे या पर्यायी पुलाबाबत पुरातत्त्व विभागाकडील अडथळा पार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृती समिती आज आयुक्तांना भेटणारपर्यायी शिवाजी पुलाचे काम शासनाच्या लालफितीत अडकले असल्याने याबाबत शहर टोलविरोधी कृती समितीने जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेवेळी या पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. पण, या दिवशी आंदोलन केल्यास भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण होईल यासाठी हे आंदोलन न करण्याबाबत महापौर अश्विनी रामाणे यांनी आवाहन केल्यामुळे रास्ता रोको रद्द करण्यात आला. त्यामुळे कृती समिती या कामाच्या पाठपुराव्यासाठी आज, मंगळवारी दुपारी साडेचार वाजता महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी सांगितले.
पर्यायी शिवाजी पुलाबाबत सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र
By admin | Published: April 26, 2016 12:10 AM