लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. रिपरिप सुरू असून, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यांत मात्र जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांची पातळी वाढत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात तब्बल दोन फुटांनी वाढ झाली.
जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडीप होती. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. मात्र, सोमवार सकाळपासून वातावरणात बदल होत गेला. सकाळपासून भुरभुर सुरू झाली. दुपारनंतर त्यात वाढ होत गेली. सायंकाळी मात्र त्यात वाढ होत गेली. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यांत जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असून, विविध धरणातून प्रतिसेकंद २० हजार २३२ घनफूट पाण्याचा विसर्ग होत आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. दिवसभरात दोन फुटांनी पातळी वाढून २५.५ फुटांवर पोहोचली आहे. सायंकाळपर्यंत १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांतही जोरदार सरी कोसळत आहेत. राधानगरी धरणातून १३५०, वारणातून १११० तर, घटप्रभा मधून ३९९३ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
खासगी मालमत्तेच्या पडझडीत लाखाचे नुकसान
रविवारी रात्रीपासून गगनबावड्यासह दोन-तीन तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. यामध्ये किरकोळ पडझड झाली आहे; मात्र एका खासगी मालमत्तेच्या पडझडीत एक लाखाचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा-
राधानगरी (४.३९), तुळशी (१.९६), वारणा (२४.४८), दूधगंगा (१२.१०), कासारी (१.८१), कडवी (१.३३), कुंभी (१.९३), पाटगाव (२.४७).
(फोटो ओळी स्वतंत्र दिल्या आहेत.....)