लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून, नवीन रुग्णांचे प्रमाणही अत्यल्प आहे. मात्र, तरीही गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांमध्ये खासगी लॅबमध्ये तपासणी करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. खासगी लॅबमध्ये तपासणी झाल्यानंतर जास्त रुग्ण पॉझिटिव्ह का येतात याचा शासकीय यंत्रणेनेही आढावा घेण्याची आवश्यकता आहे.
कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी दि. १ मे २०२० रोजी शेंडापार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेत स्वतंत्र कोरोना चाचणी कक्ष उभारण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातून त्या ठिकाणी स्वॅब तपासणीकरिता येत होते. खासगी रुग्णालयातील रुग्णांचे स्वॅबही तेथे येत होते, शिवाय काही खासगी रुग्णालये स्वॅब खासगी लॅबकडे पाठवित होते. जेव्हा जिल्ह्यात गंभीर परिस्थिती होती तेव्हा खासगी लॅब चालकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, नवीन रुग्णांची संख्याही आता कमी झाली आहे. शासकीय महाविद्यालयाची लॅब आजही अव्याहतपणे सुरू आहे. परंतु, सध्या तेथे स्वॅब तपासणीचे सॅम्पल कमी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची माहिती घेतली असता खासगी लॅबमधील रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण तुलनेने शासकीय लॅबपेक्षा जास्त आहे. खासगी लॅब व रुग्णालयाकडून सरकारी यंत्रणेला दिलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
दिनांक एकूण पॉझिटिव्ह खासगी लॅब शासकीय लॅब
दि. १ फेब्रुवारी १३ २ ११
दि. २ फेब्रुवारी ६ ४ २
दि. ३ फेब्रुवारी ९ ८ १
दि. ४ फेब्रुवारी १४ ८ ५
दि. ५ फेब्रुवारी १६ १२ ३
दि. ६ फेब्रुवारी ६ ४ २
दि. ७ फेब्रुवारी १३ ७ ६
दि. ८ फेब्रुवारी ३ ३ ०
दि. ९ फेब्रुवारी १४ ८ ६
दि.१० फेब्रुवारी १३ १० ३
दि. ११ फेब्रुवारी १८ १६ २
दि. १२ फेब्रुवारी २२ १३ ९
दि. १३ फेब्रुवारी ७ ६ १
‘आरटीपीसीआर’सह ‘एचआरसीटी’चाचणी
केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे कोविड चाचणी करायची असेल तर ती आरटीपीसीआर चाचणीच ग्राह्य धरली गेली आहे. तरीही काही खासगी रुग्णालये एचआरसीटी करायला सांगत आहेत. एचआरसीटीचा स्कोर जरी जास्त आला तरी त्या रुग्णास कोविड रुग्ण मानला जात नाही. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी करावीच लागते. मग आधी एचआरसीटी चाचणी करण्याचा सल्ला देण्यामागचा हेतू तपासण्याची आवश्यकता आहे.