इंदूमती गणेश ।कोल्हापूर : बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या चाईल्डलाईन संस्थेने गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी काम करणाºया अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता केली आहे. यात यावर्षी मुक्त केलेल्या ३० बालकामगारांचा समावेश आहे. मात्र, अशा मुक्त केलेल्या बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे नियोजित कृती आराखडा नसल्याने या बालकांचे पुढे काय होते, हा प्रश्न अधांतरीच राहतो. आज, बुधवारी जागतिक बाल कामगारविरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने.
कायद्याने वय वर्षे १८ च्या आतील मुलांकडून काम करवून घेणे अथवा त्यांना भिकेला लावणे हा गुन्हा आहे. २०१२ च्या कायद्यानुसार गॅरेज, विडी कारखाने, कापड कारखाने, काचेचे कारखाने, खाण अथवा हॉटेल, विविध आस्थापना, कार्यालयांमध्ये काम करणारी, रस्त्यांवर खेळणी विकणे, भीक मागणारी मुले ही बालकामगार म्हणून ओळखली जातात. कोल्हापूर शहरात भवानी मंडप, महाद्वार रोड, बिंदू चौक, चप्पल लाईन, स्टॅँड, रेल्वे स्टेशन अशा भागांत हे बालकामगार आढळतात. गरिबी, अनाथपण, शिक्षणाचा अभाव, कौटुंबिक कलह, पालकांचे आजारपण यामागची कारणे आहेत.
आॅगस्ट २०११ पासून आतापर्यंत चाईल्डलाईन संस्थेने अडीचशेहून अधिक बालकामगारांना मुक्त केले आहे. या बालकांच्या पालकांना समज देऊन सोडले जाते. बालकामगारांचा शोध घेण्यासाठी धाडी टाकल्या जातात. मात्र पूर्वकल्पना आधीच मिळाल्याने यात पथकाच्या हाती फार काही लागत नाही.पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच : मुक्त झालेले बालकामगार अनाथ असतील तर त्यांना बालकल्याण संकुलासारख्या संस्थांमध्ये पाठविले जाते. पालक असतील तर त्यांना समज दिली जाते. मालकावर गुन्हा दाखल झालेल्या केसेस नसल्यात जमा आहेत. या बालकांना व्यसनाधीनता, पैशांची चटक लागल्याने गुन्हेगारीसारखे वळण लागते. संस्थेत रवानगी झालेल्या बालकांना बंदिस्तपणे जगण्याची सवय नसते. शाळा मध्येच सुटल्याने शिक्षणातही रस नसतो. अशा मुलांच्या पुनर्वसनाचा फार मोठा प्रश्न आहे. या बालकांना पु्न्हा शिक्षण, समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ठोस यंत्रणा नसल्याने हा विषय अधांतरीच आहे.परप्रांतीयांचे प्रमाण अधिकगेल्या काही वर्षांत बालकामगारांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सध्या जे काही रस्त्यांवर विविध साहित्याची विक्री करणारे बालकामगार आढळतात, ते मुख्यत्वे बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहेत. यातील बहुतांश मुले आई किंवा वडिलांसोबत कोल्हापुरात येऊन चरितार्थ चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे; तर काहीजण पैसे मिळविण्यासाठी मालकांकडे काम करतात. याशिवाय हुपरी, रुकडी तसेच झोपडपट्टीच्या परिसरातील शाळाबाह्य मुले मोलमजुरी करतात.
बालकामगारांना मुक्त करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी ‘चाईल्डलाईन’ संस्था काम करते; पण बालमजुरी आणि बालभिकारी या दोन्ही विषयांमध्ये त्या-त्या क्षणी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असते. काम करून पोट भरताहेत ना, असा विचार न करता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - अनुजा खुरंदळ, समन्वयक, चाईल्डलाईन