लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकाच शेतकऱ्याच्या नावावर ५० हून अधिक युरियाची विक्री, पॉस मशीनचा वापर नाही, यासह विविध कारणांसाठी जिल्ह्यातील २६ शेती सेवा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. त्यांचे परवाने रद्द केले असून, आता विक्रेत्यांवर कारवाई केली असली, तरी यापुढे शेतकऱ्यांवरही कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
खतांचे वाटप व्यवस्थित व्हावे, अनुदानित खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी शासनाने खत विक्रीवर नियंत्रण आणले आहे. शेतकऱ्यांची मागणी आणि विक्रेत्यांकडून उठाव झालेला माल, यावरचही कृषी विभागाने अंकुश ठेवला आहे. त्यासाठी पॉस मशीन, खत विक्री रजिस्टर नोंदणी, खतांचा स्टॉक व दराचे फलक या बाबींची सक्ती केली आहे. खतांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत असतात, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील शेती सेवा केंद्रांची झाडाझडती सुरू केली आहे. जिल्ह्यातील १८१ केंद्रांची तपासणी केली. त्यामध्ये २६ केंद्रांवर अनियमितता आढळल्याने त्यांच्यावर थेट कारवाई केली. गडहिंग्लज, कागल, हातकणंगले, शिरोळ व भुदरगड तालुक्यांतील या केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत.
एकाच शेतकऱ्याच्या नावावर ५० पेक्षा जास्त युरियाची विक्री दाखवली आहे. ही बाब गंभीर असून, यापुढे विक्रेत्यांसह ज्याच्या नावावर खताची विक्री झाली आहे, त्या संबंधित शेतकऱ्यांवरही कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कोट-
जि्ल्ह्यात तपासणी केली असता, काही केंद्रांवर अनियमितता आढळली, त्यांचे परवाने निंलबित केले. नियमांचे पालन न करणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई केली जाईल.
- चंद्रकांत सूर्यवंशी (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)