गारगोटी : कूर (ता. भुदरगड) येथील नामदेव गुरव यांनी आपल्या मुलग्याला स्वत:ची किडनी दान देऊन पुनर्जन्म दिला आहे.कूर (ता. भुदरगड) येथील रामचंद्र गुरव हा वर्षभर दोन्ही किडन्या निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देत होता. मृत्यूशी दोन हात करणाऱ्या रामचंद्रसाठी वडील नामदेव गुरव(वय ६८) यांनी आपली किडनी देऊन त्याला पुनर्जन्म दिला.
रामचंद्र हा पुणे येथे एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. गेल्या दिवाळीत त्याला अचानक शारीरिक त्रास जाणवू लागला. अनेक औषधोपचार केले; पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईना. तपासणीअंती त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजले आणि गुरव कुटुंबीय पूर्णत: खचून गेले.
उघड्या डोळ्यांसमोर जीवनाचा अंधकार दिसू लागला. जगण्याची आशा धूसर झाली. पत्नी, मुलगा आर्यन व मुलगी शुभ्रा या लहानग्यांचे भविष्य काय? याची चिंता कुटुंबियांना सतावू लागली. गेले आठ-नऊ महिने आठवड्यातून तीन वेळा डायलेसीस सुरू होते. आठवड्याला १५ हजार रुपये खर्च असे आतापर्यंत तब्बल सहा ते सात लाख रुपये उपचारांसाठी खर्च झाले.
यासाठी कंपनी व कंपनीतील मित्रांची खूप मदत झाली. किडनी बदलणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; पण पर्यायी किडनी उपलब्ध होत नसल्याने त्याच्या जीवनाची आशा दिवसेंदिवस मावळत चालली होती. सर्वसामान्य कुटुंबातील हा तरुण मृत्युशय्येवर पडून जगण्यासाठी धडपडत होता. अखेर त्याचे ६८ वर्षांचे वडील नामदेव गुरव यांनी मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. तसे डॉक्टरांना बोलून दाखविले.
सर्व कागदपत्रे व तपासण्या करून त्यांची एक किडनी यशस्वीरीत्या मुलग्याच्या शरीरात रोपण करण्यात आली. ही अवघड शस्त्रक्रिया अॅपल सरस्वती हॉस्पिटल, कोल्हापूर येथील डॉक्टरांनी यशस्वीपणे केली. किडनी दान करून स्वत:च्या मुलाला जणू पुनर्जन्मच देणाºया वडिलांच्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.