रुकडी माणगाव : रात्रीची वेळ, सुनसान परिसर आणि कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली वर्दळ अशा परिस्थितीत जखमी अवस्थेत पडलेल्या एका युवकाला जीवदान देण्याचे काम माणगाव येथील युवकांनी केले आहे.
अधिक माहिती अशी, कोल्हापूर - इचलकरंजी मार्गावर अतिग्रे फाट्यानजीक एक युवक खड्ड्यामध्ये पडला होता. माणगाव येथील विकी सगरे, आशुतोष भरत पाटील आणि आशिष मोहन पाटील हे हेरले येथून कामावरून घरी परतत होते. अतिग्रे फाटा मार्गानजीक कोणीतरी अनोळखी युवक खड्ड्यामध्ये पडलेला दिसला. यावेळी अतिग्रे येथील युवक उत्तम पाटील पेट्रोल आणण्यासाठी जात असताना या युवकास या तिघांनी हाक मारली आणि हे चौघे त्या पडलेल्या युवकाजवळ गेले. अंधार असल्याने बेशुद्ध स्थितीत पडलेल्या युवकास उचलून दिव्याच्या उजेडात आणले असता त्याच्या कानातून व नाकावाटे रक्त बाहेर पडत होते. याशिवाय अन्य ठिकाणी इजा झाली होती. या चौघा युवकांनी या जखमी युवकाचा रक्ताळलेले चेहरा स्वच्छ करून त्याच्या गळ्यात असलेल्या ओळखपत्रावरून त्याच्या मालकांशी संपर्क साधला. मालकाने त्याच्या घरी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत या युवकांनी रुग्णवाहिकेची व्यवस्थाही केली. रुग्णवाहिका येईपर्यंत जखमी युवकाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले होते. सर्वांनी मिळून जखमी युवकास इचलकरंजी येथे हलविले. तेथून सीपीआरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. या बेशुद्ध युवकाकडे सकाळपर्यंत कोणाचे लक्ष गेले नसते तर अप्रिय घटना घडली असती. या युवकांनी अनोळखी युवकाचे प्राण वाचविण्यासाठी धडपड करत माणुसकीचे दर्शन घडवून आणले.