कोरोनामुळे सरत्या वर्षातील आठ महिन्यांचा कालावधी घरात बसूनच गेल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का घसरला. सहकुटुंब घरातच असल्याने घरफोडी, चोऱ्या, अपघातांचे प्रमाण घटले. पण कौटुंबिक कलह तसेच कौटुंबिक वादातून खुनाच्या घटना वाढल्या. लॉकडाऊनमुळे पोलीसच रस्त्यावर असल्याने रस्ते ओस पडले. आपोआप अपघातांचे प्रमाणही कमी झाले. २०२० मध्ये पोलीस दप्तरी एकूण ४३४७ गुन्ह्यांची नोंद झाली तरी २०१९ च्या तुलनेत २५१ गुन्हे घटल्याचे दर्शविते. तसेच सरत्या वर्षात ५१ प्राणघातक अपघात घडल्याची नोंद आहे.
प्रदूषणमुक्त वातावरण
लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ घटली. परिणामी वायू प्रदूषण आपोआप मोठ्या प्रमाणावर थांबले. कारखानेही बंद राहिल्यामुळे धुरामुळे होणारे वायू प्रदूषणही थांबले. परिणामी सुमारे ८० टक्के वातावरण प्रदूषणमुक्त बनले. नागरिकांना मुक्त श्वास घेता आला. वर्षभर जत्रा, यात्रा यांनाही पायबंद घातल्याने कोल्हापूरची जलवाहिनी पंचगंगा नदीचे पाणीही प्रदूषणमुक्त झाले.