कोल्हापूर : नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खून करून येथील रंकाळा खाणीत टाकल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने विश्वास बंडा लोहार (३०, रा. तिसंगीपैकी मुसलमानवाडी, ता. गगनबावडा) यास मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी ही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ५ नोव्हेंबर २०१७ रोजी पन्हाळा तालुक्यातील मरळी येथील प्रदीप सरदार सुतार (९) याचा खून विश्वास याने उसने पैसे मागितल्याच्या रागातून केला होता.मरळी येथील सरदार तुकाराम सुतार आणि आरोपी विश्वास नात्याने मावस भाऊ आहेत. सरदार यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यांनी विश्वासला घर बांधण्यासाठी ४० हजार रुपये हातउसने दिले होते. दरम्यान, सरदार यांच्या भावाचा अपघात झाल्याने त्यांना पैशांची गरज निर्माण झाली. त्यामुळे उसने दिलेले पैसे दे, अशी मागणी विश्वास यांच्याकडे त्यांनी केली. पण, तो उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ करीत राहिला. तू‘सारखे पैसे मागताेय बघतो मी काय करायचे ते ’ अशी धमकी दिला होती. त्यानंतर सरदार यांच्या घराच्या दारासमोरून मुलगा प्रदीपला विश्वास घेऊन गेला. प्रदीप सायंकाळी साडेसहा वाजले तरी घरी परतला नाही. त्याची शोधाशोध सुरू झाली. काही ग्रामस्थांनी प्रदीपला घेऊन विश्वास रंकाळा बसस्थानकात आल्याचे सांगितलेे. तेथे आरोपी विश्वास एकटाच सापडला. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर दोन दिवसांनी प्रदीपचा मृतदेह रंकाळा खाणीत तरंगताना मिळाला. यामुळे प्रदीपचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी २२ साक्षीदार तपासले. आरोपी विश्वास यास तीन कलमांखाली प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, एका कलमाखाली सात वर्षे तर दुसऱ्या कलमाखाली दहा वर्षे सक्त मजुरी आणि खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेचे शिक्षा झाली.
आईच्या हातचा चहा घेतला..मुलाचा घात केला.सरदार यांच्या घरी घटनेच्या आदल्यादिवशी विश्वास आला होता. त्यावेळी सरदार यांच्या पत्नीने त्यास चहा करून दिला. चहा पिऊन घरासमोर विश्वास बसला. त्यावेळी प्रदीप घरासमोर खेळत होता. तेथून तो प्रदीपला घेऊन गेला आणि त्याचा विश्वासने घात केला.