कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले यांच्या खूनप्रकरणी दोषारोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रीतम गणपती पाटील (वय ४२, रा. म्हाडा कॉलनी, एसएससी बोर्डमागे, कोल्हापूर) याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बंगला खरेदीच्या आर्थिक वादातून ३ मार्च, २०१७ रोजी किरवलेंचा खून झाल्याचे तपासात उघड झाले.ॲड. एस. एस. तांबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅ. किरवले एसएससी बोर्डाच्या मागे अरिहंत पार्क येथे राहत होते. आरोपी प्रीतम पाटील आणि किरवले एकमेकांच्या संपर्कात होते. किरवले यांचा बंगला खरेदी करण्याचा व्यवहार सन २०१७ मध्ये झाला होता. या व्यवहाराचे ३ मार्च २०१७ रोजी संचकारपत्रही झाले होते; मात्र या व्यवहाराच्या आर्थिक कारणातून दोघांत वाद झाला.त्याने किरवलेंच्या बंगल्यात घुसून मूळ संचकारपत्राची मागणी केली. ते मिळाले नसल्याने त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याने किरवलेंचा जागीच मृत्यू झाला. या खून प्रकरणात दुसरा आरोपी असलेली त्याची आई मंगला गणपती पाटील हिने मदत केली होती.या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांत विजयसिंह रजपूत यांनी फिर्याद दिली होती.या प्रकरणात १७ साक्षीदार तपासले. दाखल पुरावे, साक्षी आणि युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी आरोपी प्रीतम पाटील याला जन्मठेपेची शिक्षा आणि तीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.
आंबेडकरी विचारांचे अभ्यासकडॉ. किरवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे गाढे अभ्यासक होते. डॉ. आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचे ते प्रमुख होते. ते मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य (ता. परळी वैजनाथ) येथील होते. त्यांनी लेखनाच्या माध्यमातून आंबेडकरांच्या विचारांचा देशभर जागर केला.