इंद्रजित देशमुखसुखाच्या शोधात निघालेल मानवी मन ज्यावेळेस श्रद्धेच्या आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडत त्यावेळेला मनामध्ये अनंत प्रश्न निर्माण होतात. भांबावलेल्या अवस्थेत परमार्थ करत असताना काय खरं आणि काय खोटं याबद्दल प्रचंड साशंकता निर्माण होते. या साशंकतेच्या वेळेला मनाचं हे झालेल विचलन कमी करण्यासाठी माणूस परत-परत त्याच त्याच चुका करू लागतो आणि मग खरा परमार्थ दूर राहून आम्ही आंतरिक परमार्थ न करता निव्वळ परमार्थाच बाह्यांगाने अनुकरण केल्याचं दिसतं. त्यातून प्राप्त तरी काहीच होत नाही निव्वळ निरर्थक श्रम झालेले असतात आणि त्या श्रमास अनुसरून प्राप्तव्याचा विचार केला तर हाती काहीच नसतं. या सगळ्या निरर्थकतेचा मनापासून विचार केला तर त्याचे एकच कारण आमच्या अवलोकनी येत आणि ते म्हणजे भय.ज्याला खरोखरं मनापासून परमार्थाच्या प्रांतातून चालायच आहे त्याचं भय निरसन व्हायला हवं, तरच तो खरा परमार्थ करू शकतो. भय निरसनासाठी साधकाकडे अलिप्तता नावाच गुण असावा लागतो. कमळाचे पान पाण्यात असून भिजत नाही किंवा स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापरलेली पळी प्रत्येक पदार्थात बुडते पण कुठल्याच पदार्थाची चव ती स्वीकारत नाही. नेमकं त्याच प्रमाणसंसारी असावेअसोनि नसावे ।।हा साधकाचा भाव असावा. सत्कार, मान, पूजा, अपमान, तिरस्कार, अशा कोणत्याच ऊर्मीने साधकाचे मन विचलित व्हायला नको. त्याने अविचल राहावे. जो असा अविचल राहतो तो भयात सापडतच नाही. एकदा अकबराने तानसेनाचे गायन ऐकून त्याची खूप तारीफ केली आणि विचारलं ‘तू इतका छान गातोस तर तुझे गुरु किती छान गात असतील? मला तुझ्या गुरूंच गाणं ऐकायच आहे’ तानसेनाने अकबराला आपल्या गुरूंचे म्हणजे स्वामी हरिदासांचे गाणे ऐकायला जंगलात नेले आणि गाणं ऐकवले. त्यांचं गाणं ऐकून दोघेही तृप्त झाले आणि काही दिवसांनी परत आले परत आल्यानंतर अकबराने तानसेनाला विचारले ‘तानसेन तुही गातोस आणि तुझे गुरुही गातात पण तुझ्या गाण्यात तुझ्या गुरुंच्या गाण्याइतके स्नेह दिसत नाही याचं कारण काय?’ तानसेनाने दिलेले उत्तर खूप गोड आहे तानसेन म्हणतो, ‘महाराज मी तुमच्यासाठी म्हणजे एका सामान्य राजासाठी गातो तर माझे गुरुजी या जगाच्या राजासाठी म्हणजे देवासाठी गातात. माझ्या गाण्यात प्रदर्शन आहे, माझ्या गुरुजींच्या गाण्यात दर्शन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला भीती आहे, मी भिऊन गातो पण माझे गुरु अभय होऊन गातात’. अकबर विचारतात, ‘तानसेन तुला कशाची भीती? तानसेन म्हणतो जे आहे ते माझ्याजवळून जाण्याची, ज्या पदावर आहे त्या पदावरून पायउतार होण्याची, थोडक्यात जे प्राप्त आहे त्या प्राप्तव्याच्या जोपासणे बद्दलच्या साशंकतेची, पण माझे गुरु यातील कोणत्याच आलंबनात अडकलेले नाहीत म्हणून ते अभयवास करतात आणि म्हणूनच ते सदैव आनंदात आहेत व त्याच आनंदाच्या भरात ते असे गाऊ शकतात.’तुमचा माझा विचार केला तर जगातल्या कितीतरी आलंबनात आपण अडकून असतो म्हणूनच आम्ही भयात अडकलेले असतो. जो कोणत्याच आलंबनात अडकून नसतो तो भयरहित म्हणजे नित्य अभयात वास करत असतो. यासाठीच आमच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सोळाव्या अध्यायात दैवासुरसंपद्विभागयोग सांगत असताना दैवी गुणांच्या मधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा गुण सांगितलेला आहे, तो अभय हा आहे. पारमार्थिका जवळ असणारा हा सगळ्यात मोठा देखणा गुण आहे त्याचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात,तरी न घालुनी महापुरी।न घेपे बुडनयाची शीयारी।का रोगु न गणिजे घरी।पथ्यचिया।।तसं पाहिलं तर या ओवीच्या माध्यमातून आमचे ज्ञानोबाराया निर्भय आणि अभय या दोन्ही संकल्पना स्पष्ट करतात.वास्तविक एखाद्या भयाच्या प्रांतातून वावरत असताना कुठलं तरी कवच किंवा निवारण वापरून त्या भयातून मुक्त होणं म्हणजे निर्भय होणं पण त्या भयाच्या प्रांतात प्रवेशच न करण किंवा प्रवेश केलाच तर त्या भयाच्या अस्तित्वाचा कोणताच प्रभाव स्वत:वर न पडू देणं म्हणजे अभयांकित होण होय. पण हे होण्यासाठी ज्ञानोबारायांच्या भाषेतआगा अभय येने नावे। बोलिजे ते हे जाणावे।सम्यक ज्ञानाचे आघवे। धावणे हे।। अशी किंवा तुकोबारायांच्या भाषेत आता भय नाही ऐसे वाटे जीवा। घडलीया सेवा समर्थाची ।।असा अधिकार आमच्या ठायी यावा लागेल. असा अधिकार आला आणि या जगाचा मालक देव आहे, त्या मालकाशिवाय माझे कुणीच काही घडवू अथवा बिघडवू शकत नाही फक्त त्याच्या इच्छेइतका प्रयत्न करणं माझ्या हातात आहे आणि तो मी निजनिष्ठेने करणार हा निर्धार आमच्या मनात निर्माण होऊन पक्का झाला की आम्ही सदैव अभयात वास करू शकतो.तो अधिकार आणि ते सामर्थ्य प्रकट होण्याचे बळ त्या परम सत्ताधीश परमात्म्याने आम्हाला द्याव आणि आम्ही तो प्रामाणिक प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)
अभयांकित जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:52 AM