भारताची लोकसंख्या आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने वापरण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे आखाती देशांमधून उत्पादीत होणारे कच्चे इंधन भारत मोठ्या प्रमाणात आयात करीत आहे. वापर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मागणीही मोठी आहे. तीस वर्षांपूर्वी अगदी २५ ते ३० रुपये प्रतिलिटर असणारा पेट्रोलचा भाव आज ९८ रुपये ५० पैसे, तर डिझेलचा भाव ८८ रुपये ७५ पैसे इतका प्रतिलिटर झाला आहे. त्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे शासनाने उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पाडले आहे. उद्योगांच्या मालकांनीही नाेकर कपात, महिन्यातील १५ दिवसच काम आणि पगारही, तर काहींनी थेट जोपर्यंत लाॅकडाऊन उठत नाही, तोपर्यंत उद्योग व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काम नाही, तर पगारही नाही, अशा अर्थिक संकटात लाखो लोक अडकले आहेत. काम शोधण्यास बाहेर जावे, तर दुचाकीमध्ये पेट्रोल हवे; मात्र खिशात पैसे नाहीत तर पेट्रोल कुठून भरणार, असा प्रश्न बेरोजगारांना पडत आहे. त्यात भरीला भर म्हणून दिवसागणिक पेट्रोल, डिझेलचे भाव वाढू लागले आहेत.
या सर्वांवर अनेकांनी सायकल वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांनी ऑनलाइन सायकल खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. विना इंधन सायकल, पर्यावरणाचा समतोल राखते, खर्च शून्य आणि कुठेही पार्किंग करता येते. त्यामुळे अनेकांनी स्वस्तातील सायकलचा पर्याय निवडला आहे.
तेलाच्या किमतीपेक्षा त्यावरील कर असे,
दिल्लीत १ मे २०२१ ला असे होते पेट्रोल, डिझेलचे भाव (इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावरून)
पेट्रोल डिझेल
मूळ किंमत ३२.६१ ३४.२७
अधिभार ००.२८ ०.२५
एक्साईज ड्युटी ३२.९० ३१.८०
वितरकाचे कमिशन ०३.७५ ०२.५८
व्हॅट अधिक वितरकाच्या कमिशनसहित - २०.८६ ११.८३
किरकोळ विक्रीचा दर ९०.४० ८०.७३
कोल्हापुरातील शनिवार (दि. १५ मे) चे दर
मूळ किंमत अधिक केंद्राचे कर ६७.८० ६८.७५
राज्य सरकारचा कर २७.३६ १७.६४
वितरकाचे कमिशन ०३.१६ ०२.०१
आजचे दर ९८.३२ ८६.४०
पेट्रोलचे दर (प्रतिलिटर)
१९९१ - २५ ते ३० रुपये
२००१- ३० ते ३५ रुपये
२०११- ४५ ते ५० रुपये
२०२१ मे १५ - ९८.६०
पुन्हा सायकलवर यावे लागणार
प्रतिक्रीया
पेट्रोलचे भाव खिशाला परवडणारे नाहीत. त्यापेक्षा सायकलवरून जाऊन काम केलेले बरे. त्यातून व्यायाम आणि स्वस्तात काम होते. केवळ व्यायामापुरती उपयोगी असलेली सायकल आता बहुउपयोगी ठरत आहे.
विजय आदमापुरे,पाचगाव
प्रतिक्रीया
पेट्रोलवरील कराचा बोजा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही. त्यामुळे पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा सायकलवरून जाऊन काम केलेले उत्तम ठरत आहे.
- अमोल कोरगावकर, कोल्हापूर.
प्रतिक्रीया
आजच्या कोरोनाच्या काळात लाखोंची दुचाकी आणि त्यात रोजचे शंभरचे पेट्रोल खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे आपली विना इंधनची सायकलच भारी पडत आहे. कोल्हापूरचा विचार करता पाच किलोमीटरच्या परिघातच अनेक कार्यालये आहेत. त्यामुळे सायकलवरून सर्वत्र जाणे सोईचे पडते.
-प्रतापसिंह घोरपडे, साने गुरुजी वसाहत.