कोल्हापूर : पावसाळ्यात जमिनीत मुरलेले तसेच खडकांतून पाझरणारे पाणी तळघरात एकत्र करून ते अंघोळीपासून कपडे धुण्यापर्यंत व स्वच्छतागृहापासून ते कुंड्यांतील झाडांना घालून टेरेसवर बगीचा फुलविण्याचा अनोखा प्रयोग राजारामपुरीतील बकरे कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, या पाणी बचतीचा संदेश परिसरातील सुमारे पाच-सहा कुटुंबीयांनीही घेऊन त्यांनीही पाणी बचतीचा मार्ग अवलंबला आहे.राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील व्यवसायाने आर्किटेक्चर असलेले मोहन गोविंद बकरे त्यांचे भाऊ आर्टिस्ट विलास बकरे व नंदकुमार बकरे यांनी पाणी बचतीचा संदेश परिसरातही पोहोचविण्याचे काम कृतीतून केले आहे. बकरे कुटुंबीयांना इमारतीच्या पायातच पाणी लागले. मोहन बकरे हे आर्किटेक्चर असल्याने त्यांनी त्याच पाण्याचा वापर नियोजनबद्ध केला. त्यांनी खोदकामात साचलेल्या पाण्यात दगड-धोंडे टाकले. अशा सुमारे ६०० फूट जागेवर त्यांनी स्लॅब टाकून पाण्याला आतील खोली तीन फूट उंचीची ठेवून टाकीचे स्वरुप आणले, याच पाण्याचा वापर करून तीन मजली इमारत बांधली आहे. बकरे कुटुंबीयाने याच तळघरामधील पाणी विद्युत मोटरद्वारे चौथ्या मजल्यावर टाकीत टाकून त्यातून टेरेस गार्डन फुलवले आहे. यासाठी विद्या बकरे यांचेही मोलाचा हातभार लाभला. टेरसवरील टाकीतील पाणी पुन्हा पाईपलाईनद्वारे स्वयंपाकघरासह शौचालय, स्वच्छतागृह, कपडे धुण्यासाठी तसेच चक्क वॉशिंग मशीनसाठीही वापरात आणले आहे. या घरातील लहान मुले ही आंघोळीसाठीही हेच पाणी दररोज वापरतात तसेच हेच वापरलेले पाणी तळमजल्यात रस्त्याकडेच्या झाडांना पुन्हा वापरले आहे. टेरेसवरील गार्डनमध्ये त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून ठिबकचा वापर केला आहे. त्यामुळे पाण्याचीही बचत होत आहे. टेरेसवरच पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी छोटी-छोटी भांडी ठेवली आहेत. दिवसभरात या ठिकाणी अनेक पक्ष्यांचा वावर असतो. विलास बकरे हे सायंकाळी विविध प्रकारचे आवाज काढून पक्ष्यांना टेरेसवर बोलावितात. या पाण्याचा वापर करून आमच्या पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त सर्व गरजा पूर्ण करतो, आमच्या कुटुंबातही एकूण १६ जण हेच पाणी वापरत असल्यामुळे पाण्याचे बिलही अत्यल्प येते.
पाझरणाऱ्या पाण्यावर फुलविले जीवन
By admin | Published: May 19, 2016 11:38 PM