हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दि शुगर टेक्नॉलोजिस्टस असोसिएशन आॅफ इंडिया (नवी दिल्ली) यांच्यावतीने जीवन गौरव पुरस्काराने कोलकाता येथे गौरविण्यात आले. उद्योगपती रणजित पुरी व असोसिएशनचे अध्यक्ष संजय अवस्थी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे व किशोरी आवाडे, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी जवाहर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, सुरुवातीला प्रतिदिन केवळ २५०० मेट्रिक टन उसाचे गाळप व दीड मेगावॅट वीजनिर्मिती करणारा जवाहर आज प्रतिदिन १२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून २७ मेगावॅट वीजनिर्मिती करत आहे. त्यापैकी १५ मेगावॉट वीज विद्युत मंडळाला निर्यात करत आहे. देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा साखर उद्योग सध्या अत्यंत अडचणींतून मार्गक्रमण करत आहे. हा उद्योग वाचविण्यासाठी केंद्र सरकारने बाजारात साखरेचा भाव किमान ३६०० रुपये निश्चित करण्याची गरज आहे. ते म्हणाले, जवाहर साखर कारखान्याने सन २०१८-१९ या गाळप हंगामात ि३१.४० टक्के वाफेच्या सहाय्याने १७ लाख ६३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून इतर कारखान्यांना मार्गदर्शक आणि फायदेशीर ठरेल, अशी चांगली तांत्रिक कार्यक्षमता प्राप्त केली आहे.
प्रकाश आवाडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:21 AM