इचलकरंजी : येथील भरचौकातून आज, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम, सह्यांच्या धनादेशांची चार बुके व तीन एटीएम कार्डे असलेली बॅग चोरट्यांनी हातोहात लंपास केली. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रमेशचंद्र बैजनाथ बगाडिया (रा. महेश अपार्टमेंट, आवाडेनगर) हे सूत व्यापारी आहेत. आज, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांनी येथील के. एल. मलाबादे चौकात असलेल्या एचडीएफसी बॅँकेतून एक लाख ३४ हजार ४०० रुपयांची रक्कम काढली. ती रक्कम त्यांनी एका बॅगेत ठेवली. या बॅगेतच सह्या केलेल्या कोऱ्या धनादेशांची चार बुके, तीन एटीएम कार्डे होती. बॅँकेतून बाहेर पडल्यानंतर बगाडिया हे आपली मोटारसायकल घेऊन शिवाजी उद्यानजवळ असलेल्या शॉपिंग सेंटरजवळ उभारले होते. त्यावेळी त्यांनी बॅग आपल्या मोटारसायकलच्या हँडलला समोरच्या बाजूस अडकवली होती. ते मित्रासोबत बोलत थांबले असताना गांधी पुतळ्याकडून हीरो होंडा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी बगाडिया यांच्या गाडीला अडकवलेली बॅग घेऊन बंगला रोडच्या दिशेने पोबारा केला. ही घटना लक्षात येताच बगाडिया यांनी आरडाओरडा केला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. बगाडिया यांनी तातडीने गावभाग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर एचडीएफसी बॅँकेतील सीसीटीव्ही व जनता बॅँकेच्या परिसरातील फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये आक्षेपार्ह काही आढळून आले नाही. गावभाग पोलिसांनी बगाडिया यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. (प्रतिनिधी)
भरचौकातून सव्वा लाखाची बॅग लंपास
By admin | Published: October 30, 2014 1:07 AM