कोल्हापूर : बागल चौकातील रंग विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला पाठीमागील बाजूस भगदाड पाडून चोरट्याने लॉकरमधील एक लाख ८१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे शनिवारी (दि. २८) उघडकीस आले.पोलिसांनी सांगितले, फिर्यादी राजेश गणपतराव शिंदे (वय २२, रा. राजारामपुरी २ री गल्ली) यांचे बागल चौकात रंगाचे दुकान आहे. शनिवारी ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. चार ते पाच दिवस रंगविक्रीतून जमा झालेले एक लाख ८१ हजार रुपये सोमवारी बँकेत भरायचे असल्याने त्यांनी दुकानाच्या लॉकरमध्ये सुरक्षीत ठेवले होते. रात्री चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला.
लॉकरच्या चाव्या ड्रॉव्हरमधून काढून रोख रक्कम लंपास केली. रविवारी सकाळी शिंदे यांना शेजारील दुकानदारांनी फोन करून भिंतीला भगडाद पडल्याचे सांगितले. शिंदे यांनी दुकानात येऊन पाहिले असता, चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुकानातील कपाटाचे ठसे घेतले आहेत. पाळत ठेवून चोरट्याने ही रक्कम लंपास केल्याची पोलिसांची शंका आहे. परिसरातील सीसीटीव्हीवरून चोरट्यांचा माग पोलीस घेत आहेत. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करीत आहेत.