कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीसह बंगला, घर, किंवा एखाद्या लोकेशनवर लावलेल्या सेटवर चित्रीकरण करण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी मान्यता दिली. मात्र, बाजारपेठ किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण करता येणार नाही. अन्य राज्यातील चित्रीकरण संपवून इथे सेट लावण्यासाठी लागणाऱ्या कालावधीनुसार १५ जूननंतर कोल्हापुरात चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने अनलॉकअंतर्गत जाहीर केलेल्या नियमावलीनुसार स्तर ४ मधील जिल्ह्यांमध्ये लोकेशनवरील व स्टुडिओतील चित्रीकरणाला सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. या नव्या नियमावलीबाबत अभिनेते आनंद काळे यांच्यासह काही चित्रपट व्यावसायिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बाजारपेठा किंवा शहर-जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी असे फिरते चित्रीकरण करता येणार नाही, हे स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलमध्ये राज्य शासनाने संचारबंदी लागू केली, त्याअंतर्गत चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणावरदेखील बंदी आली. यामुळे कोल्हापूर चित्रनगरीत सुरू असलेल्या दोन मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले. त्यापैकी ‘ज्योतिबा’ ही मालिका आता चॅनलने बंदच केली आहे, तर दुसऱ्या हिंदी मालिकेचे चित्रीकरण सध्या हैद्राबादमध्ये सुरू असून, या आठवड्याचे चित्रीकरणाचे शेड्युल पूर्ण करून ते १५ तारखेला कोल्हापुरात येणार आहेत. त्यानंतर येथील चित्रीकरण सुरू होईल. आणखी एका मराठी मालिकेचे चित्रीकरण जे कोल्हापुरात सुरू होणार होते, ते लॉकडाऊनमुळे गुजरातला नेण्यात आले. या मालिकेचा सेटअपदेखील कोल्हापुरातील एका आऊटडोअर लोकेशनवर हलवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णयदेखील या आठवड्यात होणार आहे.
---
वेळ वाढवून देण्याची मागणी
मालिकांचे चित्रीकरण १२ तास चालते, सध्या सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सायंकाळी किंवा रात्री चित्रीकरण करायचे असेल तर अडचण होणार आहे. शिवाय पुढच्या भागांचे चित्रीकरण कमी पडणार आहे, त्यामुळे ही वेळ वाढवून किमान ७ वाजेपर्यंतची परवानगी मिळावी, अशी चित्रपट व्यावसायिकांची मागणी आहे.
---