कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीमध्ये हिरक नावाचा धातू मिसळला आहे. ज्याच्यापासून प्राचीन काळापासून मूर्तीवर प्रकाश फेकला जातो. जुन्या राजवाड्यामध्ये शाहू महाराजांचे थडगे असल्याचा उल्लेख अशी चुकीची माहिती महाराष्ट्र शासनाच्याच वेबसाइटवर आहे. तातडीने हा सर्व मजकूर हटवून संशोधक, इतिहास अभ्यासक यांनी मान्य केलेला मजकूर द्यावा, अशी मागणी होत आहे.
kolhapur.gov.in वेबसाइटवर अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा आणि पन्हाळ्याबाबत चुकीची माहिती दिली असून याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा पद्धतीने वेबसाइटपाहून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची यामुळे दिशाभूल होत असून शासकीय वेबसाइटवर माहिती देताना शहानिशा का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चौकट
अंबाबाई मूर्तीबद्दल चुकीचे मद्दे
१ अंबाबाईची मूर्ती ही हिरक नावाचा धातू मिसळून केली आहे. ज्याच्यापासून मूर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो.
२ अंबाबाईच्या डाव्या हातात पानाचे ताट असल्याचा चुकीचा उल्लेख आहे.
३ निद्रा विडा हा शेजारतीसाठी शब्द असताना या मजकुरामध्ये भाषांतर करून निद्र विदा हे गाणे म्हणतात, असा उल्लेख आहे.
४ मूर्तीच्या हातात गदा असताना तलवार असल्याचाही उल्लेख आहे.
चौकट
भवानी मंडपाबाबतचे चुकीचे मुद्दे
१ जुना राजवाडा येथे थडगे असल्याची निखालस खोटी माहिती दिली आहे.
२ १८१३ मध्ये सर सदा खान यांनी भवानी मंडप बांधल्याचा उल्लेख.
पन्हाळ्याबाबतही अनेक चुकीचे संदर्भ या वेबसाइटवर देण्यात आले आहेत.
चौकट
चुकीची माहिती अशी झाली उघड
गेल्या आठवड्यात मुंबईहून काही पर्यटक कोल्हापुरात आले होते. अभ्यासक रमाकांत राणिंगा हे त्यांना माहिती देण्यासाठी बरोबर होते. भवानी मंडपमध्ये तुळजाभवानी मंदिराची राणिंगा माहिती देत असताना यातील एका महिलेने येथे थडगे कुठे आहे, अशी विचारणा केली. तेव्हा हा राजवाडा आहे. येथे थडगे कसे असेल, अशी उलट विचारणा राणिंगा यांनी त्यांना केली. तेव्हा अहो मी वेबसाइटवर वाचून आले आहे आणि तुम्ही नाही कसे म्हणता, असा प्रतिप्रश्न त्या महिलेने केला. यानंतर राणिंगा यांनी ही वेबसाइट पाहिली असता अंबाबाई मूर्ती, भवानी मंडप आणि पन्हाळ्याबाबतही अनेक चुकीचे संदर्भ दिल्याचे त्यांच्या लक्षात आले.
कोट
या वेबसाइटवर जी माहिती दिली आहे. ती एखादा शाळकरी मुलाने लिहिलेल्या निबंधासारखी आहे. काही संदर्भ तर अतिशय चुकीचे आहेत. तारखा चुकल्या आहेत. गचाळ भाषा आणि शुद्धलेखनाच्या गंभीर चुका यामुळे हा मजकूर दिशाभूल करू शकतो. त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब हा मजकूर बदलावा.
-रमाकांत राणिंगा,
इतिहास अभ्यासक