कोल्हापूर : गुरुवारपासून किरकोळ स्वरूपात पुनरागमन करत भूरभूर शुक्रवारीही कायम राहिली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. यामुळे मागील आठवड्यात पाऊस थांबल्यानंतर झालेल्या पेरण्यांच्या उगवणीची चिंता मिटली आहे. पण ज्यांची शिवारे अजून गारठली आहेत, त्यांची मात्र मशागतीच्या कामांमध्ये पंचाईत केली आहे.
जिल्ह्यात हा आठवडाभर पूर्णपणे कोरडा राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण बुधवारपासूनच काहीशा हलक्या सरींनी पावसाने आगमन केले होते. तसे दोन दिवस कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणारी हलकीशी सर असे वातावरण राहिले आहे. शुक्रवारी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत अवघा ४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अगदीच तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे रुई आणि इचलकरंजी हे दोनच बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. उर्वरीत सगळे खुले झाल्याने यावरून होणारी वाहतूकही सुरळीत झाली आहे.
दरम्यान हा पाऊस नव्याने उगवण होणाऱ्या व झालेल्या पिकांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. आगुप पेरणी झालेल्या भात, सोयाबीन व भुईमूग यांनाही खतांचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने उघडीप घेतल्याने आडसाली उसाच्या लागणीलाही जोर आला आहे. साधारपणे १५ जुलैपर्यंत पाऊस जोर धरणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज गृहीत धरून आडसाली लागणीची घाई केली जात आहे, पण रोपाऐवजी कांडी लागवडीलाच जास्त प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. याशिवाय ज्यांनी अजूनही उसासाठीचा शेवटचा मिरगी डोस दिलेला नाही, अथवा दिला आहे, पण मागील आठवड्यातील पावसाने वाहून गेला आहे, ते खतांची मात्रा देण्यात व्यस्त असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.