कोल्हापूर : अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या हवामान खात्याला गुरुवारीही पावसाने हुलकावणी दिली. धुवाधार पावसाच्या अंदाजाच्या जागी दिवसभर नुसतीच भुरभुर सुरू राहिली. आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत.
रविवारी मघा (सासूचा पाऊस) नक्षत्र निघत आहे. पाऊस जोर धरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र जोर वाढल्याने पाणीसाठा वाढत चालला आहे.जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत १५.९५ च्या सरासरीने १९१ मिलिमीटर पाऊस पर्जन्यमापकावर नोंदवला गेला आहे. गगनबावड्यापेक्षा एक मि.मी.ने राधानगरीत जास्त पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात असे प्रथमच घडले आहे.
राधानगरीत ३१, गगनबावड्यात ३०, शाहूवाडी २५, चंदगड २३, भुदरगड २०, पन्हाळा १९, आजरा १८, गडहिग्लज ८, करवीर ७, कागल ४, हातकणंगले २, शिरोळ १ मि.मी. असा पाऊस झाला आहे.पाऊस कमी झाल्याने पूरही ओसरला असून नद्यांचे पाणी पात्रात आले आहे. मात्र नदीकाठ अजून गाळाने भरलेला आहे. अजूनही २५ बंधारे पाण्याखाली आहेत. तथापि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी २७ ते ९४ मि.मी. असा पाऊस झाला आहे.
पाऊस असल्याने धरणे एकापाठोपाठ एक ओसंडून वाहत आहेत. गुरुवारी दुपारी आजऱ्यातील चित्री धरण १०० टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याआधीच राधानगरी, जांबरे, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे, ही धरणे १०० टक्के भरली असल्याने ही संख्या आता सहावर पोहोचली आहे. काळम्मावाडी धरण ९० टक्के भरले आहे. वारणा ८४ टक्के, तर तुळशी ८६ टक्के भरले आहे.तुळशी, चिकोत्रा वगळता सर्व धरणांतून विसर्गतुळशी, चिकोत्रा वगळता जिल्ह्यातील सर्व १२ प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरीचा तीन क्रमांकाचा एक दरवाजा खुला असून २८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणेतून ७२११, काळम्मावाडीतून ४४००, कासारीतून १७५०, जांबरेतून १२५६, घटप्रभातून १०६९ असा सर्वाधिक विसर्ग सुरू आहे. अन्य प्रकल्पांतून १०० ते ४०० क्युसेक असा किरकोळ विसर्ग होत आहे.