मलकापूर : कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथील कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात भाताच्या पिकावर तणनाशक औषध मारण्यास गेलेल्या सुहास कृष्णा पाटील (३६) व स्वप्निल कृष्णा पाटील (३१) या सख्ख्या भावांचा अतिउच्च विजेच्या तारेचा स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३) ४ वाजता घडली. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.सुहास व स्वप्निल यांनी दोन दिवसांपूर्वी कडवी नदी काठी असणाऱ्या शेतात भाताची रोप लावण केली होती. बुधवारी दुपारी येथे तणनाशक औषध मारत असताना सुहास यांना अतिउच्च विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसला. त्यांना पाहण्यासाठी गेलेल्या स्वप्निल यांनाही विजेचा धक्का बसला. यातच या दाेघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण अजून का आले नाहीत हे पाहण्यासाठी वडील कृष्णा पाटील शेतात गेले असता त्यांना दोघेही मृतावस्थेत आढळले. दरम्यान, या घटनेचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
कुटुंबच उद्ध्वस्त
दोन्ही मुलाच्या मृत्यूने संपूर्ण पाटील कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील येळाणे गावच्या हद्दीत दोघे भाऊ सर्व्हिसिंग सेंटर चालवित होते. त्यांच्या मृत्यूने कोपार्डे गावावर शोककळा पसरली आहे. सुहास यांचा विवाह झाला होता. त्यांना मुलगी असून, त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण व पत्नी असा परिवार आहे.