कागल : दुपारी कागल परिसरात आलेल्या वळीवाच्या पावसापासून वीटभट्टीतील विटा भिजू नयेत म्हणून प्लास्टिक कागद बांधत असताना काही फूट अंतरावर वीज कोसळल्याने लिंगनूर दुमाला (ता. कागल) येथील सहाजण बेशुद्ध झाले. नशीब बलवत्तर म्हणून सर्वजण बचावले आहेत. ही घटना दुपारी साडेचारच्या दरम्यान येथील जवाहर नवोदय विद्यालयासमोरील माळावर असलेल्या वीटभट्टीवर घडली.सतीश गंगाराम कुभांर, छाया गंगाराम कुभांर, साधना सतीश कुंभार,( रा. शाहुनगर लिंगनूर दुमाला) नागेश अशोक कासोटे (रा. कागल) उमेश विजय घाऊट (शाहुनगर) दीपक सदाशिव शिरोळे (रा. लिंगनूर दुमाला) अशी जखमींची नावे आहेत. उमेश घाऊट वर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की सतीश कुंभार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी नवा आवा लावला आहे. दुपारी वळीवाचा पाऊस येणार याचा अंदाज आल्याने ते आई-पत्नीसह तेथे आले होते. विटा भिजून नुकसान होऊ नये म्हणून या आव्यावर प्लास्टिकचा कागद बांधण्याचे काम सुरू केले. त्यासाठी उमेश, नागेश आणि दीपक या मित्रांनाही बोलवून घेतले. हे सर्वजण प्लास्टिकचा कागद बांधत असताना पाऊसही सुरू होता.काही कळायच्या आत वीस फुटाच्या अंतरावर जोरदार कडकडाट करीत वीज कोसळली. या धक्क्याने हे सहाजण बेशुद्ध होऊन खाली पडले. जवळच एका वीटभट्टीजवळ असलेले तानाजी कुंभार, धनाजी कुंभार, अमर माने, राघू पाटील यांना हा प्रकार दिसला. त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यापैकी तिघांना कोल्हापूर येथे दाखल केले. एक तासाभरात सर्वजण शुद्धीवर आले.
काही कळायच्या आत घडले..या घटनेतील जखमी दीपक शिरोळे म्हणाले की, आम्ही कागद बांधत असताना विजेचा प्रचंड झोळ आणि कानठळ्या बसविणारा आवाज झाला. शरीरात काहीतरी घुसल्यासारखे झाले आणि आम्ही बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा दवाखान्यात होतो. अजूनही मनात भीती बसली आहे. देवाच्या कृपेने आम्ही बचावलो आहोत.