इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदी अधिकच गडद झाल्याने सूतगिरण्यांपाठोपाठ येथील यंत्रमाग कारखाने दीपावलीपूर्वीच बंद पडण्यास सुरुवात झाली आहे. दीपावली बक्षिसासह कामगारांच्या वार्षिक हिशेबाची रक्कम भागवून नजीकच्या आठवड्यात वस्त्रनगरीतील चक्रे पूर्णपणे थांबणार आहेत. आगामी लग्नसराई हंगामाच्या पार्श्वभूमीवर दीपावली सणानंतर आठवड्याभरात दरवर्षी यंत्रमाग कारखाने सुरू होतात. मात्र, हंगामासाठी कापडास मागणी येण्याची चिन्हे दिसत नसल्याने यंत्रमाग कारखाने पुन्हा ताबडतोब चालू होण्याची शंका व्यक्त होत आहे.महाराष्ट्राबरोबर देशातील काही राज्यांत गेली दोन-तीन वर्षे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह अन्य उद्योगधंद्यांमध्येही मंदीचेच वातावरण आहे. तसेच अलीकडील काळात लोकांच्या विशेषत: युवा पिढीच्या गरजा बदलल्या आहेत. अन्न-पाण्यापाठोपाठ टी.व्ही., मोबाईल, दुचाकी वाहन यांना प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर कपड्यांचा नंबर लागतो आणि अलीकडील कपडे पूर्वीपेक्षा टिकावू आहेत. अशा कारणांमुळे वस्त्रोद्योगामध्ये काहीशी मंदी होती.दुष्काळामुळे कापसाचे पीक कमी झाले आणि जून महिन्यापासून कापसाची टंचाई जाणवू लागली आहे. ३६ हजार रुपये प्रती खंडी मिळणारा कापूस ५० हजार रुपयांवर पोहोचला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे भाव महाग झाले. सुताच्या दराबरोबर कापडाचा उत्पादन खर्च वाढला. वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात कापडाला भाव मिळत नाही आणि कापडाला मागणी नसल्याने कापड उत्पादक पर्यायाने यंत्रमागधारक नुकसानीत गेला.अशा स्थितीत शासनाने यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून द्यावी, अशी अपेक्षा यंत्रमाग उद्योजक करू लागले. वीजदर सवलत, कर्जावरील व्याजदराचेअनुदान, चीनमधून आयात केलेल्या कापडावर बंदी, अशा मागण्या राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्यांनी सरकारने प्रतिसादही दिला; पण प्रत्यक्षात पदरात काहीही पडले नसल्याने यंत्रमाग उद्योजकांत नाराजी व नैराश्य पसरले आहे. अशा पार्श्वभूमीवर आता नुकसानीत सुरू असलेले यंत्रमाग कारखाने बंद करण्याचा निर्णय यंत्रमागधारक घेऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)आगामी हंगामाची साशंकताआगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर कापडाचा उठाव होईल. चांगला भाव मिळेल, अशा आशेने यंत्रमाग कारखाने दीपावलीनंतर आठवड्याभरात सुरू होत. पण, सरकारचे दुर्लक्ष आणि लग्नसराईच्या काळात तरी कापडास मागणी वाढेल का, याबाबत साशंकता असल्याने आता दीपावलीनंतरही कारखाने ताबडतोब सुरू होण्याची शक्यता नसल्याची चर्चा येथील वस्त्रोद्योगात आहे.
दीपावलीपूर्वीच यंत्रमाग कारखाने बंद
By admin | Published: October 14, 2016 12:25 AM