कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणाºया राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणाºया लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आता ही महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीस होणार आहे.
‘लोकमत’तर्फे आतापर्यंत नाशिक व औरंगाबादला ही महामॅरेथॉन झाली. नागपूरला ११ फेब्रुवारीस होणार आहे. तत्पूर्वी ही महामॅरेथॉन कोल्हापुरात २८ जानेवारीस सकाळी सहा वाजता पोलीस परेड ग्राऊंडवरून होणार होती. ३, ५, १० आणि २१ किलोमीटर गटांत ही मॅरेथॉन होणार असून, त्याची ‘लोकमत’तर्फे जय्यत तयारीही पूर्ण झाली आहे. मॅरेथॉनसाठी नोंदणीची मुदत १५ जानेवारीपर्यंत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विजेत्यांना रोख बक्षिसासह मेडल दिली जाणार आहेत. ही मॅरेथॉन पोलीस परेड ग्राऊंडपासून सुरू होऊन कावळा नाका, विद्यापीठ, शाहू नाका व तेथून परत त्याचमार्गे पोलीस परेड ग्राऊंडवर समाप्त होणार होती.
दरम्यान, लिंगायत धर्माला संविधानिक ‘स्वतंत्र धर्म’ मान्यता मिळावी, अल्पसंख्याक दर्जा मिळावा व जनगणना अर्जात लिंगायत नोंदीसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे २८ जानेवारीलाच कोल्हापुरातील दसरा चौकातून सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चासाठी मुख्यत: महाराष्ट्रातून व शेजारच्या कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने लिंगायत बांधव येणार आहेत; परंतु महामॅरेथॉनसाठी सकाळी सहा वाजल्यापासून मॅरेथॉनच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येते. त्यामुळे मोर्चाला शहरात येणाºया लिंगायत बांधवांची गैरसोय झाली असती, त्यामुळे ‘लोकमत’ने ही मॅरेथॉन पुढे ढकलावी, अशी विनंती लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने रविवारी ‘लोकमत’ व्यवस्थापनाकडे केली. त्या समाजाच्या भावनांची दखल घेऊन ‘लोकमत’ने महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन मोर्चास सहकार्य केल्याबद्दल लिंगायत समन्वय समितीने ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.