शशिकांत भोसले -- सेनापती कापशी--चिकोत्रा खोऱ्याला वरदान ठरलेला चिकोत्रा प्रकल्प यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे फक्त ४५ टक्केच भरला. परिणामी, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ४० गावांतील शेती आता संकटात सापडली आहे. त्यातच चिकोत्रा नदीवर उपसाबंदी केल्यामुळे शेतातील उभा ऊस आता वाळून जात आहे. त्यामुळे या खोऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यातल्या त्यात कागल तालुक्यात तर पावसाने पूर्णपणे पाठच फिरविली. परिणामी, चिकोत्रा खोऱ्यातील ऊस तातडीने उचलण्याची घोषणा सर्वच कारखान्यांनी केली; पण आजची परिस्थिती पाहता अजून निम्मा ऊस शिवारातच आहे. बेलेवाडी काळम्मा येथील संताजी शुगरने आजपर्यंत सर्वाधिक ऊस या परिस्थितीत उचलून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यापाठोपाठ हमीदवाडा व शाहू कारखान्याचा नंबर लागतो.चिकोत्रा प्रकल्प हा कागल, आजरा व भुदरगड तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. हा प्रकल्प झाल्यामुळेच चिकोत्रा नदीत बारमाही पाणी वाहू लागले. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळला; पण यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने तर या धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले असून, उपसाबंदी केली आहे. जर पाणी उपसले, तर संबंधित शेतकऱ्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. यामुळे शेतातील उभा ऊस आता डोळ््यांसमोर वाळून जात आहे. चिकोत्रा खोऱ्यात अद्याप सुमारे दोन लाख मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. चिकोत्रा नदी तर कोरडीच पडली आहे. पाण्याचा दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी तोडणी यंत्रणा या परिसरात राबवून तातडीने ऊस उचलणे गरजेचे आहे, अन्यथा उसावर गुलाल टाकून पेटवून नेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल, तर हा ऊस आता कोणत्याही परिस्थितीत उचलावाच लागेल.कारखान्यांच्याकडे शिल्लकव उचललेला ऊस पुढीलप्रमाणे : संताजी शुगरने ७० हजार मे.टन ऊस उचलला असून, अद्याप सुमारे ५० हजार मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. हमीदवाडा साखर कारखान्याने आजपर्यंत सुमारे ७४ हजार मे. टन ऊस उचलला असून, अद्याप ७० हजार मे. टन. ऊस उचल होणे बाकी आहे, तर शाहू साखर कारखान्याने ५५ हजार मे. टन ऊस उचलला असून, सुमारे ६५ हजार मे. टन ऊस उचलणे बाकी आहे.
चिकोत्रा खोऱ्यातील ऊस वाळला
By admin | Published: January 20, 2016 11:59 PM