अतुल आंबी ल्ल इचलकरंजीएस. टी. महामंडळाने ‘प्रवासी वाढवा अभियान’ सुरू केले असले तरी इचलकरंजी बसस्थानकात मात्र वेगळेच अभियान सुरू असल्याचे दिसते. प्रवासी आपणहून गरजेपोटी बसस्थानकावर आले तरी त्यांची गैरसोय झाल्याचे दिसते. परिणामी, प्रवाशांना वडाप व अन्य वाहनांचा पर्याय शोधावा लागतो. त्यामुळे वडाप व बसस्थानकाचे अधिकारी यांच्यात काही लागेबांधे आहेत का? अशी चर्चा प्रवाशांतून होत आहे.इचलकरंजी येथून सुटणाऱ्या बसचे वेळापत्रक कोलमडले असून, याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. तसेच शाळेच्या वेळेतील बसेसचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी दोन-तीन तास बसस्थानकावरच बसून असतात. कॉलेज, शाळांना सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडलेले विद्यार्थी दुपारी एक-दोन वाजेपर्यंत उपासमार करीत बसस्थानकावरच घुटमळत असतात. दरम्यानच्या वेळेत विनाकारण टवाळखोरी, कॉमेंटस् याचा सामना विद्यार्थिनींना करावा लागतो, अशा त्रासाला कंटाळून काही विद्यार्थिनी शिक्षण थांबवितात. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज बनली आहे. बसस्थानकातील चौकशी कार्यालयात बस कधी लागणार? अशी विचारणा केली असता आगारातून आली की लावतो, असे उत्तर दिले जाते. प्रवाशांना बस कोठून येते, याबाबत काहीच देणे-घेणे नसते. मात्र, अशा अनपेक्षित उत्तरांमुळे प्रवासी नाइलाजास्तव वडापचा वापर करतात; परंतु विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पास असल्याने त्यांना पर्याय नसतो. त्यामुळे तेथेच बसून राहावे लागते.अनेक एस.टी. बसला नावाच्या पाट्याच लावलेल्या नसतात, तर अनेकवेळा पाटी दुसरी व गाव तिसरेच दिले जाते. त्यामुळे हात दाखवा बस थांबवा, या योजनेला हरताळ फासला जात आहे. बस थांबवून चौकशी केली असता पाटी लावलेल्या गावाला ती बस जात नसल्याचे समजते, तर न पाटी लावलेल्या बसेसमुळेही प्रवासी बुचकळ्यात पडतात. शहरालगत असलेल्या गावांना जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले असून, यामध्ये तत्काळ सुधारणा करावी; अन्यथा ग्रामीण भागातील नागरिक व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्रितपणे आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. (वार्ताहर)चौकशी केंद्राची उद्धट वर्तणूकचौकशी केंद्रातून प्रवाशांना उद्धट उत्तरे दिली जातात. याबाबत अनेकवेळा तक्रारी होऊनही त्यांच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. विचारणाऱ्या प्रवाशालाच वयाचे भान न ठेवता उद्धट बोलले जाते. महिलांनाही तशीच वागणूक मिळते. त्यामुळे चौकशी केंद्रात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे, अशी मागणी होत आहे.
चांदी, चंदन, गुटखा, गांजा, जनावरांची तस्करी
By admin | Published: February 09, 2017 12:13 AM