उद्धव गोडसे
कोल्हापूर : गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १९ लाख २० हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा आणि चार लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला. काल, रविवारी (दि. ४) पहाटे शहरातील असेंब्ली रोडवर ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान, मद्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पोचालक मात्र पथकाला गुंगारा देऊन पसार झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारे एक वाहन गगनबावडामार्गे कोल्हापुरात येणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार एक भरारी पथक कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर तैनात होते. मात्र, पथकाला चकवा देऊन टेम्पो शहरात पोहोचला.पहाटेच्या सुमारास शहरात संशयित टेम्पो दिसला. टेम्पोमध्ये गोवा बनावटीचे मद्याचे बॉक्स आढळले. मात्र टेम्पोचा चालक पसार झाला. मद्याची अवैध वाहतूक करणारा चार लाख रुपयांचा टेम्पो (एम.एच. ०८ डब्ल्यू ९२६२) आणि १९ लाख २० हजार रुपयांचे मद्याचे २५० बॉक्स पथकाने जप्त केले.निरीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक राजेंद्र पाटील, विजय नाईक, गिरीशकुमार कर्चे, सचिन काळेल, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, संदीप जानकर, जय सनिगारे आणि मनोज पोवार यांचा पथकात समावेश होता.