कोल्हापूर : भाजप-ताराराणी महायुतीत नेत्यांचीच संख्या आधिक झाल्याने जाहीर यादीतील घोळ अद्याप मिटेना. काही उमेदवार जाहीर झाले तरी ते पुन्हा बदलण्याचे संकेत महायुतीच्या नेत्यांतून मिळत आहेत. रिपाइंही जागा आणि जाहीर उमेदवारीबाबत नाराज आहे.महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी महायुतीने सुमारे ७९ उमेदवार जाहीर करून आघाडी मारली खरी, पण वरिष्ठांचे आदेश डावलून दुसऱ्या फळीतील नेत्यांनी काही नावांत परस्पर बदल करून ती यादी जाहीर केल्याने नेते संतप्त झाले. दोन दिवसांपूर्वी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली, पण त्यासाठी नेत्यांचा कस लागला होता. सरस उमेदवार असल्याने कोणाला दुखवायचे हा पेच होता. त्यातूनही ही यादी जाहीर झाल्यानंतर अनेकजण दुखावले. ते दुसऱ्या पक्षाच्या गळाला लागू नयेत यासाठी नेत्यांनी जाहीर केलेल्या जागांतील उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्र. २४ साईक्स एक्स्टेंशन या प्रभागातून कुलदीप देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली. येथे डावलेले बबलू देसाई हे नाराज होऊन विरोधी पक्षाच्या आघाडीच्या हाती लागू नये म्हणून नेत्यांनी ही उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे दोन्हीही उमेदवार काँग्रेस नेत्यांचे समर्थक आणि नातेवाईक आहेत. या प्रभागातील इतर पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे येथील नाराज उमेदवाराला माघार घेणे अथवा बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या प्रभागाच्या घडामोडींवर नेत्यांच्याही नजरा आहेत. याशिवाय प्रभाग क्र. ३७ राजारामपुरी तवनाप्पा पाटणे हायस्कूल या प्रभागातून वैशाली अमित पसारे यांना जाहीर झालेल्या उमेदवारीबाबत पुन्हा विचार होण्याची शक्यता आहे. राजेंद्रनगर प्रभागातील अशोक भंडारे यांचीही उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू आहेत. (प्रतिनिधी)महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियानेही महायुतीकडे सुरुवातीस ११ जागांची मागणी केली होती; पण अवघ्या चार जागांवर ही तडजोड झाली. जाहीर उमेदवार हे पक्षाचेच नसल्याने रिपाइं कार्यकर्त्यांत नाराजी आहे. मंगळवारी सायंकाळी रिपाइंच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात आज, बुधवारी महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन रिपाइंसाठी दिलेल्या प्रभागातील उमेदवार बदलण्याची मागणी पक्षाचे नेते करणार आहेत.
‘भाजप-ताराराणी’च्या यादीचा घोळ
By admin | Published: October 07, 2015 12:38 AM