कोल्हापूर : विद्यमान सभागृहातील एक माजी महापौर, दोन नगरसेवकांसह माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाइकांचा भरणा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या ५० उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर झाली. चार तासांहून अधिक काळ चाललेल्या संसदीय समिती बैठकीनंतर पक्षाच्या उमेदवारीबाबत एकमताने निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. जयश्री सोनवणे, श्रीकांत बनछोडे, इंद्रजित सलगर यांच्यासह अशोक जाधव, दिलीप पोवार, नंदकुमार सूर्यवंशी यांचाही यादीत समावेश आहे. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या सून नीलोफर, तर मालोजीराजे समर्थक समीर घोरपडेंना उमेदवारी नाकारली. काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक मंगळवारी मुंबईत प्रदेश कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडली. बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, पतंगराव कदम, रमेश बागवे, सतेज पाटील, पी. एन. पाटील, सत्यजित देशमुख, प्रल्हाद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत प्रभागनिहाय उमेदवारीबाबत विस्तृत चर्चा झाली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उमेदवारांच्या नावांवर एकमत झाले. त्यानंतर पक्षाचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी ५० जणांची यादी प्रसिद्ध केली. माजी महापौर जयश्री सोनवणे (नेहरूनगर), काँग्रेसचे गटनेते श्रीकांत बनछोडे (खोलखंडोबा), इंद्रजित सलगर (बिंदू चौक) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे, तर लक्ष्मी-विलास पॅलेस प्रभागातून माजी नगरसेवक अशोक जाधव यांना बलराज कॉलनी प्रभागातून नंदकु मार सूर्यवंशी यांना, कनानगर येथून दिलीप पोवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक तुकाराम तेरदाळकर यांच्या पत्नी सुनंदा तेरदाळकर यांना शाहू कॉलेज प्रभागात उमेदवारी दिली आहे. नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्या मातोश्री शोभा पंडितराव बोंद्रे यांना चंद्रेश्वर प्रभागातून उमेदवारी दिली आहे. माजी परिवहन सभापती शिवाजी डोंगळे यांच्या पत्नी शोभा डोंगळेंना पंचगंगा तालीम प्रभागातून उमेदवारी दिली.नगरसेवक मधुकर रामाणे यांची सून अश्विनी अमर रामाणे यांना शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातून तिकीट देण्यात आले. रायगड कॉलनी बाबा जरगनगर प्रभागातून रामाणे यांनी पत्नी विमल रामाणे यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती, परंतु त्यांना थांबण्यास सांगण्यात आले तर तेथून वैभवी संजय जरग यांना उमेदवारी दिली आहे. वैभवी या भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना जरग यांची नातसून आहे. त्यांना दोनच दिवसांपूर्वी भाजपने उमेदवारी नाकारली होती. (प्रतिनिधी)दीपा मगदूमना उमेदवारीमाजी महापौर कै. दिलीप मगदूम यांच्या पत्नी दीपा मगदूम यांना राजलक्ष्मीनगर प्रभागातून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. मगदूम यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांचे दिवसकार्य झाल्यानंतर ही घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सुरेखा शहा कोण ? कॉँग्रेसच्या यादीत सुरेखा फेमचंद शहा यांना शाहू मार्केट यार्ड येथून उमेदवारी दिल्याचा उल्लेख आहे. ही माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना कळताच या सुरेखा शहा कोण, अशी विचारणा केली जाऊ लागली. शहा या स्वप्निल तहसीलदार यांची जवळची नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली. आता १३ प्रभागांची लवकरच घोषणा काँग्रेसने यापूर्वी १८ उमेदवारांची घोषणा केली होती. मंगळवारी आणखी ५० उमेदवारांची घोषणा केली असून आता राहिलेल्या १३ प्रभागांतीलच उमेदवारांची घोषणा होणे बाकी राहिले असून ती लवकरच करण्यात येईल, असे सांगण्यात आले. आजरेकर, घोरपडे यांना उमेदवारी नाकारलीमुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या सून नीलोफर यांना कॉमर्स कॉलेज प्रभागातून सतेज पाटील यांनी उमेदवारी देण्याचा ‘शब्द’ दिला होता, परंतु प्रसिद्ध झालेल्या यादीत त्यांचे नाव नाही. आजरेकर यांच्या उमेदवारीसाठी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी कडाडून विरोध केला. विधानसभेच्या निवडणुकीत गणी आजरेकर यांनी आपल्यास विरोध केला, असा आक्षेप ठेवून पाटील यांनी विरोध केल्याने आजरेकर यांचे नाव मागे पडले. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार मालोजीराजे समर्थक असलेले समीर घोरपडे यांनी संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून उमेदवारी मागितली होती परंतु त्यांनाही डावलण्यात आले आहे.
काँग्रेसच्या यादीमध्ये बनछोडे, सलगर, सोनवणे
By admin | Published: October 07, 2015 12:39 AM