चिपळूण : इंदिरा आवास घरकूल योजनेची यावर्षीची चिपळूण तालुक्याची यादी रद्द करण्यात आली आहे. आता फेरयादी पाठवण्याचे आदेश आले असले तरी अनेक गावातून पक्की घरे असणारी मंडळी प्रतीक्षा यादीत असल्याने ज्यांना खरोखरच गरज आहे किंवा जे बेघर आहेत, त्यांची मात्र गैरसोय होत आहे. इंदिरा आवास घरकुल योजनेअंतर्गत शासनस्तरावर १ लाखाचे अनुदान लाभार्थ्याला दिले जाते. वर्षानुवर्ष ही योजना राबवली जात असताना ग्रामीण भागात त्याबाबत आता गैरफायदा घेतला जात आहे. ज्यांची पक्की घरे आहेत किंवा ज्यांना आवश्यकता नाही, अशा लाभार्थींना ही घरे दिली जात असल्याने काही ठिकाणी चौकशीची मागणी होते. स्थानिक पातळीवरील शह काटशहाचे राजकारण आडवे येते आणि अधिकाऱ्यांचा बळी जातो. चिपळूण तालुक्यातील इंदिरा आवासच्या घरकुलाची पाहणी कोकण विभागाच्या उपआयुक्तांनी केली असता अनेक लाभार्थी बोगस आढळले. तालुक्यात सुमारे २५ घरांची कामे बोगस आहेत. लोकांनी पारदर्शकपणे काम करुन प्रशासनाला सहकार्य करावे व या योजनेचा गरजूंना लाभ द्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी शुभांगी पाटील यांनी केले आहे. पूर्वी घरकुल बांधताना ग्रामपंचायतीतर्फे अनुदान दिले जात होते. परंतु, आता आॅनलाईन प्रक्रियेद्वारे अनुदान दिले जाते. ग्रामपंचायतीची प्रतीक्षा यादी सक्षम असेल व काटेकोर असेल तर कोणतीही अडचण येत नाही. परंतु, अनेक ठिकाणी राजकीय हेतूने प्रेरित होऊन पक्के घर असणाऱ्याचे नावही प्रतीक्षा यादीत ढकलले जाते. १० ते १२ लोकांना वाचविण्यासाठी गरजू लोकांचे नुकसान राजकीय मंडळी करतात. चिपळूणची यादी रद्द झाल्याने नवीन यादी काटेकोरपणे तयार करावी, यासाठी आपण पंचायत समितीच्या मासिक सभेत, ग्रामसभा बैठकीत आवाहन केले. काही ठिकाणी ग्रामसभा तहकूब होणार याचा विचार करुन पुन्हा पुन्हा ग्रामसभा घेण्यास सांगितले. तरी अद्याप यादी पूर्ण झालेली नाही. सध्या दिवस धाकाधकीचे असल्याने कोणतीही चूक झाली, तर त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागणार आहेत. प्रशासनही काटेकोरपणे यादी तयार करणार आहे. तालुक्यातील खऱ्या गरजू लाभार्थींची प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीने पाठवावी व त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
इंदिरा आवास घरकुल योजनेची यादी नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 1:33 AM