लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी साहित्यिक, कलावंत आणि रसिकांतर्फे आगळेवेगळे जनआंदोलन करण्यात येणार आहे. गदिमांच्या ४३ व्या स्मृतिदिनी सोमवारी ( दि.१४) सांगलीत गदिमांच्या काव्याचा जागर केला जाणार आहे. राज्यभरात, तसेच बृहन्महाराष्ट्र आणि परदेशातील रसिकही त्यामध्ये सहभागी होतील.
गदिमा स्मारक जनआंदोलन समितीच्या प्राथमिक बैठकीत याचे नियोजन झाले. प्रा. भीमराव धुळूबुळू, महेश कराडकर आणि अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली.
गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात स्मारक उभारण्याची घोषणा शासनाने केली होती. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याची शासनाला आठवण करून देण्यासाठी साहित्यिकांनी शब्दांचीच अस्त्रे उगारली आहेत.
कोणत्याही घोषणाबाजीशिवाय व शासन किंवा राजकीय पक्षांचा निषेध टाळून आंदोलन केले जाईल. गदिमांच्या कविता आणि गीतांचे वाचन करून शासनाचे लक्ष वेधले जाईल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तेथील साहित्यिक हे अनोखे आंदोलन करतील. गोवा, भोपाळ आणि बंगलोर येथेही आंदोलन होईल. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंड, म्यानमार, नेदरलँड आणि इटली या देशांतील मराठी बांधवही आपापल्या परिसरात गदिमांच्या कविता व गीतांचा जागर करतील. आंदोलनाच्या तयारीच्या बैठकीत परदेशी मराठी बांधवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सहभाग नोंदविला. पुण्यातील गझलकार प्रदीप निफाडकर यांनी त्याचे संयोजन केले.
-------------------------
सांगलीकरांचा सहभाग महत्त्वाचा
गदिमांचे मूळ गाव माडगूळ हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आहे. शेटफळे हे जन्मगावदेखील आटपाडी तालुक्यातच आहे. त्यामुळे देश-विदेशांतील या आंदोलनात सांगलीकरांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीला धुळूबुळू, कराडकर व पाटील यांच्यासह डॉ. अनिल मडके, दयासागर बन्ने, नामदेव भोसले, अर्चना मुळे, प्रा. संतोष काळे, वर्षा चौगुले, गौतम कांबळे, वंदना हुळबत्ते ,आदी उपस्थित होते.
-------------