शिरोळ : साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. वस्तुस्थितीला आणि वास्तववादाला धरून असते, तेच खरे साहित्य होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी रविवारी शिरोळ येथे व्यक्त केले.येथे शब्दगंध साहित्य मंच व दीनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून लवटे बोलत होते. ते पुढे म्हणाले, जीवन मूल्यांची जपणूक साहित्य करते, जीवन सृष्टीला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यात आहे. या ठिकाणी साहित्य शब्दांचे सुरूंग लावून परंपराचे तुरुंग फोडायचे आहे. तेव्हा साहित्यातील नवा विचार घेऊन वाटचाल केल्यास सुख आणि समृद्धी मिळेल.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. अनिल कुंभार यांनी स्वागत केले. ज्येष्ठ दलित चळवळीचे नेते विजय खातेदार यांनी प्रास्ताविक केले. दलितमित्र अशोकराव माने म्हणाले, माजी आमदार कै. दिनकरराव यादव यांच्या कार्याचा वारसा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम अनिलराव यादव करीत आहेत. दिनकरराव यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित केले आहे. यावेळी प्रा. भीमराव धुळूबुळू, प्रा. मोहन पाटील, बुद्धिबळपटू ऋचा पुजारी यांनी मनोगते व्यक्त केली.दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास प्रारंभ करण्यात आला. गणेशनगर ते दत्तनगर संमेलनस्थळापर्यंत दिंडी काढण्यात आली. यावेळी आमदार उल्हास पाटील, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीपराव पाटील, ‘गुरुदत्त’चे कार्यकारी संचालक राहुल घाटगे, पंचायत समितीचे सदस्य दरगू गावडे, गजानन संपकाळ, सरपंच सुवर्णा कोळी, उपसरपंच पृथ्वीराज यादव, अनिल यादव, बाळासाहेब शेख, रणजित पाटील, इसूफ मेस्त्री, भगवान कोळी, अमरसिंह पाटील, सुनील इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साहित्य हे समाजमनाचा आरसा
By admin | Published: February 01, 2015 11:54 PM