संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरोळ : १५० व्या वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या शिरोळ येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराची वाटचाल देदीप्यमान आहे. १४२ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या ग्रंथालयाची वाटचाल ही तशी ऐतिहासिकच आहे. काळानुसार आधुनिक पद्धतीने ग्रंथालयाची रचना केल्यामुळे वाचन समृद्ध पिढी घडविण्याचे काम हे ग्रंथालय करीत आहे.कोल्हापूर संस्थानचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये आपल्या कारकिर्दीत १८७७ मध्ये १४ पुस्तकालयांची स्थापना केली. त्यामध्ये शिरोळच्या पेठ्यामध्ये १ जून १८७७ मध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणून या ग्रंथालयाची स्थापना झाली होती. शिरोळचे त्यावेळचे तहसीलदार मोरो हरी ओक, मुन्सफ कोर्ट, वकील व व्यापारी या सर्वांनी मिळून ही संस्था स्थापन केलीे.१८९९ मध्ये कोल्हापूरच्या मान्यवर नेत्यांपैकी भाई माधवराव बागल यांचे वडील खंडेराव बागल, मुरलीधर वामन दामले, मुन्सफ राघवेंद्र आप्पाजी दत्तवाडकर, आदी वकील मंडळी यांनी येथे डिबेटिंग क्लब सुरूकेला होता. श्री मन्महाराज छत्रपती सरकार करवीर यांनी पहिल्या वर्षी २५ रुपये अनुदान मंजूर केले. याशिवाय बुरुजावरील तीन खोल्यांची इमारत व एक सनदी संस्थेस दिली होती. त्यानंतर १९०० साली वाचनालय पुढे सुरू ठेवण्यासाठी आर. के. पटवर्धन, राघवेंद्र कुलकर्णी, आदी चौघांचे शिष्टमंडळ छत्रपती यांना भेटले. त्यावेळी छत्रपती सरकारांनी हे अनुदान सुरूठेवण्याचा हुकूम दिला होता. १९४८ पर्यंत हे अनुदान मिळत होते.१४ जानेवारी १९१० या कालखंडात राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराची नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणून नोंदणी झाली. त्यानंतर १९४९-५० साली समिती निवडण्यात आली. स्व. फत्तेसिंह पाटील, स्व. भूपाल दादा मिणचे, स्व. बाबूराव दत्तोबा मांगुरे यांच्या समितीने तयार केलेल्या घटनेस मान्यता दिल्यानंतर १९६४ ला राजर्षी शाहू नगरवाचन मंदिर असे नामकरण करण्यात आले. १९५९ ला बाबूराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्था पब्लिक अॅक्टखाली नोंदणीसाठी फत्तेसिंह पाटील, ए. बी. मिणचे, स्व. डॉ. हुसेन अत्तार यांची समिती नियुक्तकेली. त्यानंतर राजर्षी शाहू नगरवाचन मंदिर विधिवत नोंदणीकृत झाले. या काळात ८६५ ग्रंथ होते. १९६४-६५ साली संस्था एकाच खोलीत असल्याने ग्रंथालयास जागा अपुरी पडत असल्याने पंचायत समिती शिरोळ यांना शाळेसाठी भाड्याने दिलेल्या दोन्ही खोल्या ग्रंथालयास मिळाल्या. येथूनच ग्रंथालयाच्या प्रगतीची सुरुवात झाली. १९७२ला नव्या समितीतील सीताराम ग. पाटील, रा. र. माने, भू. दा. मिणचे, डॉ. मोहन बा. पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी केली. मार्च १९७४ मध्ये संस्थेला ‘ब’ वर्ग मिळाला. याकामी संस्थेने ५१४ आजीव सभासद करून ४६ सभासद केले. देणगीदारांच्या मदतीतून ५००० रुपयांची पुस्तके खरेदी केली.ग्रंथपाल स्व. प्रकाश चुडमुंगे, स्व. एल. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात १४ ग्रंथालये व जुनी बंद पडलेली ४ अशी एकूण १८ ग्रंथालये स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सुरूकेली.१९८९ मध्ये वाचनालयास ‘अ’ वर्ग मिळाला. इमारत अपुरी पडत असल्याने सि. ग. पाटील, बा. गो. माने यांच्या कारकिर्दीत शासन व देणगीदारांकडून मिळालेले अनुदान, व गाळेधारकांकडून अनामत रक्कम घेऊन गाळे बांधण्यात आले. देणगीदारांच्या मदतीतून अभ्यासिका केंद्र बांधण्यात आले. आनंदराव माने-देशमुख यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत २०० वर्षांची जुनी इमारत निरंक करून त्याजागी आताची नवी इमारत उभारण्याचा संकल्प केला. यावेळी अनेक देणगीदारांच्या मदतीतून नवीन इमारत बांधण्यात आली.सध्या संस्थेच्या पहिल्या मजल्याचे नियोजन आहे. देणगीदारांच्या मदतीतून याही कामास लवकरच सुरुवात होणार आहे. ही इमारत झाल्यानंतर संदर्भ विभागाला स्वतंत्र मजला मिळेल. त्यामुळे प्रशासकीय कामास त्याचा उपयोग होणार आहे. संस्था कर्मचाऱ्यांचा प्रा. फंड ५ टक्के, कर्मचारी आणि संस्था ५ टक्के असे १० टक्के नियमित खात्यावर जमा केला जातो. गाळेधारकांच्या मासिक भाडे उत्पन्नातून चार कर्मचाºयांचे मासिक वेतन सुरूआहे.
साहित्य समृद्ध ‘शाहू वाचनालय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:35 AM