लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील वाखाण भागात जगताप वस्तीवर सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. घराच्या अंगणात चिमुकल्यावर झडप घालून कुत्र्यांनी त्याला फरपटत उसात नेले. सुमारे तासाभराच्या शोध मोहिमेनंतर मुलाचा मृतदेह आढळून आला.
राजवीर राहुल ओव्हाळ (रा. जगताप वस्ती, वाखाण, कऱ्हाड) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडातील वाखाण भागात असलेल्या जगताप वस्तीवर राहुल ओव्हाळ हे पत्नी वैशाली, तीन मुली व मुलगा राजवीर यांच्यासह वास्तव्यास आहेत. राहुल हे ट्रॅक्टर चालक असून सोमवारी दुपारी ते ट्रॅक्टर घेऊन कामासाठी गेले होते. तर वैशाली या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात भांगलण करीत होत्या. राजवीर हा त्याच्या बहिणींसह घराच्या अंगणात खेळत होता. काही वेळानंतर राजवीर कुठेच दिसत नसल्याचे बहिणींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत आईला सांगितले. त्यानंतर वैशाली यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी शोधाशोध सुरु केली.
सर्वांनी शोध घेतला असता नजीकच असलेल्या उसाच्या शेतात श्वानांच्या झुंडीमध्ये राजवीर निपचित पडल्याचे दिसले. राहुल यांच्यासह शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. राजवीरच्या गळ्यासह पाय आणि हाताचे श्वानांनी लचके तोडले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगीतले. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसात झाली आहे.
बहिणीचा वाढदिवस
राजवीर हा तीन बहिणींच्या पाठीवर जन्मलेला एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आकस्मित मृत्यूने कुटुंबीय पुरते हादरुन गेले. त्यातच सोमवारी राजवीरच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस होता. मात्र, त्याच दिवशी राजवीरवर काळाने घाला घातला.
आठ ते दहा कुत्र्यांची झुंड
राजवीरवर हल्ला करुन कुत्र्यांनी त्याला ओढत उसात नेले होते. वडील राहुल यांच्यासह शेतकरी उसात गेले असता आठ ते दहा कुत्रे त्याठिकाणी होते. हुसकावले तरी ते तेथून हालत नव्हते. अखेर त्यांच्यावर दगड भिरकावल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, घटनेनंतर दोन ते तीन तास ती अनेक कुत्री परिसरातच घुटमळत होती.