लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्याने कोल्हापूरकरांना दिलासा दिला आहे. कोरोनाचा महिन्याचा पाॅझिटिव्हिटी दर ९ टक्क्यांनी खाली आला आहे. रुग्णसंख्या ६ हजार ४०८ ने कमी झाली असून मृत्यूसंख्याही ४२० ने कमी झाली आहे. जून महिन्यात वाढवलेल्या चाचण्यांमुळेच हा पॉझिटिव्हिटी रेट खाली आला आहे.
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्याही कमी होती. परंतु एप्रिलनंतर मात्र पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्याही वाढत गेली. मे महिन्यात तर कहर झाला आणि ५० हजार ६७ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर १४५६ जणांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनची गरज याच महिन्यात जास्त भासली. ऑक्सिजन बेड वेळेत न मिळाल्यानेही काहींचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी आहेत.
मे महिन्यातील या वाढत्या मृत्यूसंख्येची दखल घेऊन कोल्हापुरात टास्क फोर्सचे सदस्य येवून गेले. सविस्तर आढावा बैठक घेवून त्यांनी मार्गदर्शन केले. काय केले पाहिजे याचा अहवालही दिला. मात्र तरीही रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या कमी झाली. परंतू ती रोखण्यात यश आले नाही ही वस्तुस्थिती आहे. मे महिन्यातील गोकूळ निवडणुकीचा माहोल, सीमा आणि व्यवहारबंदीसाठी झालेला उशीर अशा अनेक कारणांची चर्चा होत राहिली. परंतु मे महिन्यानंतर जूनमध्ये थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
चौकट
आव्हान कायम
जूनमध्ये जरी दिलासा मिळाला असला तरीदेखील रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. जनता, व्यापारी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यवहार सुरू करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढतो आहे. अशात चाचण्या वाढवल्या जात आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही वाढत आहे आणि मृत्यूसंख्याही कमी येत नाही. अजून पाऊस सुरू झालेला नाही. तोे सुरू झाल्यानंतर हे आव्हान आणखी बिकट हेाणार आहे.
चौकट
लसीकरणात कोल्हापूरला सापत्न भावाची वागणूक
अशा परिस्थितीत केंद्राची चूक की राज्य सरकार बरोबर या वादापेक्षा कोल्हापूर जिल्ह्याला लस पुरवठा जादा होण्याची गरज आहे. लसीबाबत कोल्हापूरला सापत्न भावाची वागणूक मिळत आहे ही वस्तुस्थिती आहे. याला निकष बदलाचे कारण सांगितले जाते. जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात दिवसाला ५० हजारांच्यावर लसीकरण होत होते तेव्हा ज्या जिल्ह्यात जादा रुग्ण आहेत तेथे लस दिली गेली. त्यामुळे कोल्हापूरची लस तिकडे गेली आणि आता कोल्हापूरला गरज आहे तेव्हा लोकसंख्येच्या आधारावर लस वाटप करण्याचा नवा निकष आल्याचे सांगितले जाते.
चौकट
मे महिना जून महिना
एकूण चाचण्या २ लाख ३८ हजार ८१८ ३ लाख ८४ हजार १११
पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५० हजार ६७ ४३ हजार ६५९
मृत्यू १४५६ १०३६
चौकट
प्रतिमहिना कोरोना मृत्यू
जानेवारी २१ ११
फेब्रुवारी २२
मार्च २७
एप्रिल ४८५
मे १४५६
जून १०३६
एकूण ३०३७
चौकट
विभागानुसार मृत्यू
कोल्हापूर महापालिका ६२८
नगरपालिका क्षेत्र ३६७
इतर जिल्हे ३८०
ग्रामीण १६६२
एकूण ३०३७