हातकणंगले : साजणी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या भारतनिर्माण योजनेमध्ये ११ लाख ५0 हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल योजनेचे अध्यक्ष आप्पासो पाटील यांच्यासह उपाध्यक्ष, तांत्रिक सल्लागार, ठेकेदार, अशा सहाजणांविरोधात हातकणंगले पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता अशोक कांबळे यांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेने साजणीसह हातकणंगले तालुक्यात खळबळ उडाली आहे.साजणी गावासाठी शासनाने २00८ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक कोटी ६२ लाखांची नळपाणी योजना मंजूर केली होती. कामाचे अंदाजपत्रक आणि देण्यात आलेला ठेक्यामध्ये भारतनिर्माण समितीने ठेकेदाराला अंदाजपत्रकापेक्षा जास्त पाच टक्के जादा दराने ठेका दिला होता. भारतनिर्माण समितीने योजना वेळेत पूर्ण केली नाही. यामुळे योजना रखडली. पुन्हा या योजनेसाठी शासनाने नव्याने दोन कोटी १७ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले. पुन्हा निविदा काढण्यात आली. यामध्ये समितीने त्याच ठेकेदाराला टेंडर नव्याने अंदाज पत्रकापेक्षा ४३ टक्के जादा दराने दिले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साजणी भारतनिर्माण योजनेच्या चौकशीसाठी राधानगरीचे गटविकास अधिकारी नाईक यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यानी योजनेची चौकशी करून अहवाल सादर केला. चौकशी अहवाल स्वीकारून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी हातकणंगले पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक कांबळे यांना आदेश देऊन संबंधित पदाधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.अशोक कांबळे यांनी साजणी भारतनिर्माणचे अध्यक्ष आप्पासो पाटील, उपाध्यक्ष महादेव जाधव, सचिव कल्पना जांभळे, तांत्रिक सेवा पुरवठादार प्रदीप पाटील, ठेकेदार विजय भिखे आणि बजरंग पाटील या सहाजणांविरोधात हातकणंगले पोीलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे रकमेची उचल४४0 मीटर पोटलाईन न टाकता ठेकेदार व अध्यक्षांनी परस्पर रक्कम उचल केली आहे. बेकायदेशीरपणे अनामत रक्कमही उचल केली आहे. तसेच अनेक रकमा मोजमाप पुस्तकात नोंद न करता उचल केलेल्या आहेत. ठेकेदार याने शासनाच्या आयकर विभाग तसेच विक्रीकराच्या रकमा भरणा केलेल्या नाहीत. हे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.
साजणीमध्ये भारतनिर्माण योेजनेत लाखोंचा अपहार
By admin | Published: April 09, 2017 12:45 AM