कोल्हापूर - विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील साडेचार हजार पशुधन पर्यवेक्षक आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. सुनील काटकर यांनी ही माहिती दिली.
सहा. आयुक्त पशुसंवर्धन पशुधन विकास अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे, पशुधन विकास अधिकारी गट पंचायत समिती पदनामात बदल करणे, तिसरी कालबद्ध पदाेन्नती वेतन निश्चितीत सुधारणा करणे, वेतनातून कायम प्रवासभत्ता मंजूर करणे, २७ ऑगस्ट २००९ ची अधिसूचना रद्द करणे, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना फ्रंटलाइन वर्कर घोषित करून विमा सुरक्षाकवच व आवश्यक सेवेतील सुविधा देणे, राज्यस्तरावरील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे त्वरित भरणे, कंत्राटीऐवजी प्रचलित पद्धतीने पदे भरणे, १२ वी नंतर तीन वर्षांचा पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करणे अशा विविध ११ मागण्या करण्यात आल्या होत्या. परंतु त्याबाबत काहीच हालचाल नसल्याने मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
कोट
आमच्या विविध मागण्यांबाबत मंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना वारंवार निवेदने दिली आहेत. परंतु मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जनावरांना बिल्ले मारणे, पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण, मासिक अहवाल, ऑनलाइन माहिती भरणे बंद करण्यात आले आहे.
सुनील काटकर, राज्याध्यक्ष, पशुचिकित्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र राज्य