सन २०१९ मध्ये महाभयंकर महापूर आणि २०२० सालात कोरोना संकट यामुळे शहरवासीयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला. वसुली एकदम कमी झाली. यावर्षी १०० कोटींनी उत्पन्न (डिसेंबरअखेर) कमी झाले आहे. भविष्यात ही तूट काही प्रमाणात भरून निघेल, पण सध्या प्रशासनाला रोजचा खर्च भागविताना कसरत करावी लागत आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारासह अन्य अत्यावश्यक खर्च वगळता अन्य विकासाची कामे मात्र बंद ठेवावी लागली आहे. गेल्या वर्षी काही कामे प्रलंबित ठेवावी लागली होती तशीच ती यावर्षीदेखील ठेवावी लागली आहेत. नगरसेवकांच्या ऐच्छिक बजेटमधील ३० कोटींची कामे मागे ठेवावी लागली आहेत. यंदा डीपीडीसीकडूनही निधी मिळालेला नाही. दि. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. गेल्या नऊ महिन्यांत एक रुपयांचेही काम झाले नाही. जी कामे सुरू आहेत, ती मागील बजेटमधील सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्यास राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे; पण त्याची अंमलबजावणी करणे अशक्य झाले आहे.