चंद्रकांत कित्तुरेकुणी काही म्हणा. कितीही सांगा, पण आम्ही प्लास्टिकशिवाय जगायच कसं. असा सवाल दररोजच्या जगण्यात प्लास्टिकशिवाय ज्याचं पानही हलत नाही ते निश्चितपणे विचारतील कारण सकाळी उठल्यानंतर दुधाच्या पिशवीपासून सुरू होणारी प्लास्टिकची गरज दिवसभराच्या दिनक्रमात अनेकवेळा भासते. मात्र, हेच प्लास्टिक मानव जातीच्या मुळावर उठले आहे.
हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. कुणी सांगितले तरी त्याची अमंलबजावणी करायची मानसिकता दिसत नाही. यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी हाच त्यावरचा पर्याय आहे.राज्यात प्लास्टिक बंदी लागू असली तरी आजही काही ठिकाणी प्लास्टिकच्या कॅरीबॅग आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर सुरू आहे. प्लास्टिकचा साठा संपविण्यासाठी व्यापाºयांना दिलेली तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत किती काटेकोर राहते, यावर राज्यातून प्लास्टिक हद्दपार होणार की नाही ते ठरेल.
हे सर्व सांगायचे म्हणजे आज जागतिक पर्यावरणदिन सर्वत्र साजरा होत आहे. आजघडीला प्लास्टिक हाच पर्यावरणाला सर्वांत मोठा धोका आहे. उपलब्ध माहितीनुसार जगभरात दर मिनिटाला दहा लाख प्लास्टिकच्या शीतपेयांच्या अथवा पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. वर्षाला एकदाच वापरल्या जाणाºया प्लास्टिकच्या पाच हजार अब्ज पिशव्या वापरल्या जातात. हे प्रमाण प्लास्टिकच्या एकूण उत्पादनाच्या निम्मे आहे. एकदाच वापरल्या जाणाºया या प्लास्टिकच्या वस्तू आपण कुठे टाकतो? एकतर जमिनीत नाहीतर पाण्यात. आज नदी, नाले, ओढे पाहिले असता त्यातील कचºयामध्ये प्लास्टिकच्या वस्तूच जास्त दिसतात. एका अहवालानुसार जगात निर्माण होणाºया प्लास्टिकमधील केवळ नऊ टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो. १२ टक्के प्लास्टिक जाळून नष्ट केले जाऊ शकते. उर्वरित ७९ टक्के प्लास्टिकचा कचरा जमिनीवर किंवा अन्यत्र टाकला जातो. तो पूर्णपणे नष्ट होत नाही. या कचºयाचे अवशेष शतकानुशतके राहतात.
अनेक प्लास्टिक वस्तूंचे छोेट्या-छोट्या कणांमध्ये रूपांतर होते. जनावरे आणि मासे यांच्या पोटात हे कण जातात. त्यांच्यामार्फत ते माणसांच्या पोटात जातात आणि आजाराला निमंत्रण देतात. जगातील बहुतांशी जलाशयांमध्ये असे प्लास्टिकचे कण आढळले आहेत. याशिवाय न कुजणारे प्लास्टिक डासांच्या उत्पत्तीलाही कारणीभूत ठरते.प्लास्टिकचे हे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर अनेक देशांनी यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिकवर बंदी घातली आहे. अमेरिका, जपानसह युरोपियन राष्टÑांत प्लास्टिकचा वापर मोठा होत असला तरी हे देश या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यातही आघाडीवर आहेत. जागरुक आहेत. आफ्रिका खंडातील सुमारे २५ देशांनी प्लास्टिकवर बंदी घातली आहे.
यातील निम्म्याहून अधिक देशांनी प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय गेल्या चार वर्षांतील आहे. चीन, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनाम या पाच देशांमधून समुद्रात सुमारे ५० टक्के प्लास्टिक कचरा येतो. हे देश वेगाने प्रगती करीत आहेत. तेथील लोकांचे राहणीमान सुधारण्याबरोबरच त्यांच्याकडून प्लास्टिकच्या वस्तूंचा वापरही वाढला आहे. यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा या देशांमधून समुद्रात मिसळत आहे. भारतातही प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे. याबाबत जनजागृतीचे काम सरकार आणि पर्यावरणवादी संस्थांमार्फत सुरू आहे. त्याला सर्वांनी साथ द्यायला हवी. सिंगापूरमध्ये चॉकलेटचा साधा कागदही रस्त्यावर टाकला जात नाही. कारण तो टाकणाºयाला जबर दंड आकारला जातो. भीतीने का होईना कायदा पाळला जातो. भारतात, महाराष्टÑातही कायद्यांची अशी काटेकोर अंमलबजावणी होईल तेव्हाच आपण प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू शकू.(लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.)kollokmatpratisad@gmail.com