इंदुमती गणेशकोल्हापूर : लहान व्यावसायिकांसाठी वरदान ठरलेल्या मुद्रा योजनेंतर्गत आजवर दिल्या गेलेल्या कर्जापैकी १८ हजार ३११ खातेदारांचे विविध बँकांचे जवळपास १४५ कोटी रुपये बुडण्याच्या मार्गावर आहेत. ही योजना २०१५ मध्ये साली सुरू झाली असून मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ११३२ कोटींचे कर्ज वाटप झाले. यामध्ये सर्वाधिक कर्ज तरुण उद्योजकांना वाटप झाले आहे. परंतु सरकारी योजनांतून कर्ज प्रकरणे मंजूर करून घ्यायची आणि त्याचे हप्ते फेडले नाहीत तरी चालतात, किंवा निवडणुका आल्यावर सरकारच माफ करते अशी लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे नियमित हप्ते भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारी यंत्रणांचेही राजकीय दबावापोटी हात बांधलेले असतात, परिणामी वसुलीवर मर्यादा येत असल्याचे अनुभव आहेत.स्वत:चा व्यवसाय सुरू करणे म्हणजे येरागबाळ्याचे काम त्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते, ज्यांना शून्यातून आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी मुद्रा याेजनेसारखी योजना नाही. या योजनेअंतर्गत लहान व्यावसायिकांना कोणत्याही तारणाशिवाय १० लाखांचे कर्ज मिळते. पण या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. अग्रणी बँकेकडील आकडेवारीनुसार योजना सुरू झाल्यापासून आजवर १८ हजार ३११ खातेदारांची १४५ कोटींची रक्कम थकित आहे. हे प्रमाण ८ टक्के इतके आहे.
‘मुद्रा’चे तीन प्रकारचे कर्ज
- शिशू कर्ज : या श्रेणीत ५० हजारांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
- किशोर कर्ज : किशोर श्रेणीत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
- तरुण कर्ज : या श्रेणीत ५ ते १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
वर्ष : कर्जाची एकूण रक्कम
- २०२१-२२ : ४९४.९७ कोटी
- २०२२-२३ : ९६४.१५ कोटी
- २०२३-२४ : ११३१.७७ कोटी
- एकूण : २ हजार ५९०.८९ कोटी
कर्ज थकीत राहण्याची कारणे
- ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेे आहे, त्या व्यवसायात अपयश.
- व्यवसायाऐवजी अन्य कारणासाठी रकमेचा वापर.
- कर्ज घेण्यापुरता व्यवसाय दाखवणे.
राज्यात ४ हजार कोटीकोल्हापूरच नव्हे तर राज्यातही मुद्रा अंतर्गत दिलेल्या कर्जापैकी एकूण ४ हजार कोटींच्या कर्जाची थकबाकी आहे. यात सर्वाधिक एनपीएचे प्रमाण किशोर गटात आहे. यामध्ये २७ हजार ४२२ खातेदारांचे १३४२ कोटी रुपये थकीत आहेत.
मुद्रा योजनेचा लाभ घेत अनेक लाेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहे. त्यांच्याकडून कर्जाची नियमित परतफेड सुरू आहे. योजनांचा लाभ घेताना नागरिकांनीदेखील आर्थिक शिस्त बाळगणे गरजेचे आहे. कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करत स्वत:ची, जिल्ह्याच्या व राज्याच्या आर्थिक सुबत्तेत हातभार लावावा. -गणेश गोडसे, जिल्हा समन्वयक. अग्रणी बँक कोल्हापूर