कोल्हापूर : नामांकित मॉलसह सैन्यामध्ये नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा वडणगेचा भामटा संदीप बाळू घोरपडे याने स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी पैसा खर्च केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची आशा संपलीच, त्यापाठोपाठ आता भरलेल्या पैशावरही पाणी सोडावे लागणार आहे. वडणगे येथील अन्य दोघे भामटे संशयित सर्जेराव बत्तासो माने, राजू वसंत पाटील हे गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मुख्य सूत्रधार संशयित भामटा संदीप घोरपडे याच्यासह रोहित संजय माने (रा. शुक्रवार पेठ), करिष्मा तुकाराम भोळे (रा. विक्रमनगर) यांना अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, संदीप घोरपडे व रोहित माने यांनी एकत्र येऊन भागीदारीमध्ये झटपट पैसा मिळविण्यासाठी ‘करिष्मा इंटरप्रायजेस’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीचे संचालक म्हणून या दोघांचीच नावे लावण्यात आली. माने हा शुक्रवार पेठेतील कागदी गल्लीमध्ये बंधुत्व अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतो. त्याने आपल्याच बिल्डिंगमधील तळमजल्यावर कंपनीचे कार्यालय सुरू केले. याठिकाणी करिष्मा भोळे हिच्यासह अन्य दोन तरुणींना नियुक्तीपत्रे देऊन अर्ज स्वीकारण्याचे काम दिले. यातून त्यांनी हजारो तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना लुबाडले. मिळालेल्या पैशातून घोरपडे याने आपले कर्ज फेडले. त्यांनी अन्य जिल्ह्यांतील तरुणांची फसवणूक केली आहे का? याची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, फसवणूकप्रकरणी घोरपडे याच्यावर करवीर व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपताच करवीर पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. मानेला नगरसेवकाचा वरदहस्त रोहित माने याला फसवणूकप्रकरणी अटक केल्याचे समजताच शहरात खळबळ उडाली. पोलीस ठाण्यात सुरुवातीला तो रुबाब मारू लागला. माझीच घोरपडे याने ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तो पोलिसांना सांगत होता. परंतु, पोलिसांनी त्याला खाकीचा प्रसाद देताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणातून त्याला बाहेर काढण्यासाठी एका नगरसेवकाने पोलीस ठाण्यात हजेरी लावून वजन वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याची याठिकाणी डाळ शिजली नसल्याची चर्चा पोलिसांत होती.
बेरोजगारांच्या पैशातून भागविले कर्ज
By admin | Published: January 05, 2015 12:24 AM