कोल्हापूर : शहरातील नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांना अर्जही पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत भरून घेतले जातील, अशी घोषणा महापौर निलोफर आजरेकर यांनी केली.पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या फेरीवाल्यांना १० हजार रुपयांच्या कर्जाचे धनादेश महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते आणि आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक कार्यालयात वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी महापौर आजरेकर बोलत होत्या.महापौर आजरेकर यांनी या योजनेसाठी महापालिकेस ६६०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट असून, हे उद्दिष्ट या महिन्यात पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. शहरातील विविध भाजी मार्केट तसेच उपनगरांमध्येही या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांचे अर्ज घेण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा. ऑनलाईन अर्ज करता यावेत यासाठी विविध ठिकाणी सेतू सेवा केंद्राच्या माध्यमातून विशेष सोय करावी, अशी सूचना केली.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, या योजनेची व्यापकता वाढवून शहरातील सर्व पथविक्रेत्यांचा समावेश केला जाईल. एकही पथविक्रेता या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे नियोजन करण्याची सूचनाही यंत्रणांना दिली.
गटनेते अजित ठाणेकर, माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक अशोक भंडारी, दिलीप पोवार, राजू जाधव, किशोर घाटगे व रघुनाथ कांबळे यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या व करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.शहरातील १० फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे धनादेश वाटप केले. वृत्तपत्र विक्रेते व जुन्या पुस्तकांचे विक्रेते यांचाही या योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे महापौर आजरेकर म्हणाल्या.