कोल्हापूर : दुष्काळसदृश स्थिती, उसाचे जादा उत्पादन या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची आगामी हंगामासाठी लगबग वाढली आहे. आतापर्यंत २९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्याचे प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालकांकडे पाठविले आहेत. तीन खासगी कारखान्यांनी अद्याप प्रस्ताव दाखल केलेले नाहीत.पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आॅगस्टपासूनच उसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. डिसेंबरनंतर कोल्हापूर विभागात भयावह परिस्थिती पाहावयास मिळणार आहे. ऊसपीक जगविणे कठीण होणार हे निश्चित आहे. यासाठी यंदाचा हंगाम लवकर सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी तयारी केली आहे. १५ आॅक्टोबरला कारखाने सुरू करण्याची तयारी काही कारखान्यांनी केली आहे. मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, डिसेंबरपूर्वी जास्तीत जास्त उसाची उचल करण्याचे नियोजन कारखान्यांनी करावे, अशी सूचनाही मंत्री समितीच्या बैठकीत केली आहे. आगामी हंगामाला मागील हंगामातील ‘एफआरपी’चा अडसर होता; पण केंद्राकडून बहुतांश कारखान्यांना सॉफ्ट लोन मिळाल्याने त्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. उर्वरित कारखान्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यात देय एफआरपीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पैसे दिले असतील व उर्वरित पैशांची हमी कारखान्यांनी दिली तर त्या कारखान्याला गाळप परवाना द्यावा, अशी सूचना मंत्री समितीने केली आहे. त्यामुळे गाळप परवान्यासाठी एफआरपीचा अडसर शक्यतो येणार नाही. आतापर्यंत विभागातील २९ कारखान्यांचे गाळप परवान्यासाठीचे प्रस्ताव साखर सहसंचालकांकडे दाखल झाले आहेत. प्रस्तावांची छाननी करून ते साखर आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहेत. दुष्काळ, जानेवारीनंतरची पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर सर्वच साखर कारखान्यांनी हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांनी १५ आॅक्टोबरला हंगाम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित कारखाने आठवडाभर पुढे-मागे सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तीन टप्प्यांतील 'एफआरपी'चा तिढासाखर कारखान्यांसमोरील अडचणी पाहता तीन टप्प्यांत 'एफआरपी' देण्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा झाली; पण याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. कायद्याने एकरकमीच 'एफआरपी' मिळाली पाहिजे, अन्यथा उसाचे दांडके हातात घेऊ, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने तीन टप्प्यांतील ‘एफआरपी’चा तिढा निर्माण होऊ शकतो.
गाळप हंगामासाठी लगबग सुरू
By admin | Published: September 29, 2015 11:45 PM