कारखाना सहकारात चांगला चालविणार - अध्यक्ष शिंत्रे
आजरा : आजरा साखर कारखान्याने जिल्हा बँकेचे थकीत ६८ कोटी ७५ लाख रुपयांचे कर्ज काल भरले. जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी विकास जगताप यांनी आज कारखान्याच्या गेटचे कुलूप काढून कारखाना अध्यक्ष व संचालकांकडे कारखान्याचा ताबापट्टी दिली.
कारखान्याचा भोंगा वाजवून व संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव देसाई यांच्या पुतळ्याला हार घालून संचालक मंडळाने कारखाना ताब्यात घेतला. आजरेकर सर्व सहकारी संस्था उत्कृष्ट चालवितात. त्याप्रमाणे आजरा कारखाना सहकारात चांगला चालविणार असल्याचे कारखाना अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी सांगितले.
आजरा साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा ३ कोटी ६४ लाखांचा हप्ता थकीत राहिल्याने बँकेने २६ मे २०२० पासून कारखाना आपल्या ताब्यात घेतला होता. कारखाना ताब्यात घेतेवेळी १ लाख ८० हजार साखर पोती व सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन त्याला कुलूप लावले होते. साखर कारखाना सहकारी तत्त्वावर चालू करण्यासाठी गेली वर्षभर अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे व संचालक मंडळाकडून प्रयत्न करण्यात आले. त्याला अखेर यश आले आहे.
जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यासाठी हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी संघटित प्रयत्न केले. उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, संचालक मुकुंद देसाई, मलिक बुरूड, दिगंबर देसाई, जनार्दन टोपले, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, एम. के. देसाई, अनिल फडके, मारुती घोरपडे, प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, रमेश वांगणेकर, अनिल देसाई, सतीश बामणे यांसह कर्मचारी उपस्थित होते.
खर्चाला बुकेपासून फाटा
कारखाना ताब्यात देण्यासाठी आलेले जिल्हा बँकेचे अधिकारी यांचे स्वागत कारखान्याच्या बागेतील फुलांचा गुच्छ करून करण्यात आले. संचालक मंडळाने आजपासूनच खर्चाला फाटा देऊन बुकेही तयार केले.
‘लोकमत’च्या वृत्तमालिकेचे संचालकांकडून अभिनंदन
आजरा कारखान्याचा इतिहास, वाटचाल, सुरू झालेनंतरची स्थिती, उसाची कमतरता व कारखाना आर्थिक डबघाईला जाण्याचे कारण यांबाबत दैनिक ‘लोकमत’मध्ये पाच दिवसांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. कारखाना सुरू करणेबाबत चिकित्सक व अभ्यासपूर्ण केलेली वृत्तमालिका व ‘लोकमत’मध्ये आलेल्या बातमींचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे व संचालक मंडळाकडून अभिनंदन करण्यात आले.
फोटो ओळी : १) आजरा साखर कारखान्याच्या गेटचे कुलूप काढून ताबा देताना जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी विकास जगताप, जावेद फरास, प्रवीण चौगुले, अध्यक्ष सुनील शिंत्रे व संचालक मंडळ.
२) आजरा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव देसाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कारखान्याची ताबापट्टी घेताना संचालक मंडळ.
क्रमांक : २९०६२०२१-गड-०२/०३