लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कोरोनामुळे शाहूवाडी तालुक्यातील हॉटेल, रिसॉर्टमध्ये पर्यटकांना प्रवेश बंद आहे. जंगल सफारी बंद आहे. पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी आहे, त्यामुळे सुमारे दोन कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे. नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे हॉटेल कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. लहान-मोठे व्यावसायिक यंदा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शाहूवाडी तालुक्यात शंभर हॉटेल व रिसॉर्ट आहेत. सर्वात जास्त आंबा येथे हॉटेल, रिसॉर्ट यांची संख्या आहे. तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
आंबा, विशाळगड, पावनखिंड, अणुस्कुरा घाट, बर्की धबधबा, उखळू धबधबा, केर्ले धबधबा, आंबाघाट, उदगिरी, येळवण जुगाई, धोपेश्वर या ठिकाणी उन्हाळ्यात व पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. कोरोनामुळे तालुका प्रशासनाने सर्व पर्यटनस्थळे बंद केली आहेत. त्यामुळे येथील हॉटेल, रिसॉर्ट बंद आहेत. छोटे दुकानदार, हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक आदिंना उदरनिर्वाहाचा प्रश्न सतत भेडसावत आहेत. आंबा येथे सत्तर ते ऐंशी हॉटेल व रिसॉर्ट आहेत. दररोज पन्नास लाख रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे रिसॉर्टधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भाड्याने चालविणाऱ्या रिसॉर्ट मालकांसमोर भाडे कसे द्यावयाचे, असा प्रश्न पडला आहे. भाडे, लाईट बिल, इमारतीचा मेन्टेनन्स, कामगार पगार या सर्वांमुळे रिसॉर्ट मालक हतबल झाला आहे. हॉटेल व रिसॉर्ट कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी इतर कामावर जाऊ लागले आहेत. विशाळगडावर पर्यटकांना बंदी असल्यामुळे येथील व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. येथील नागरिक पर्यटनावर अवलंबून आहेत. त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. आंबा येथे जंगल सफारी करणा-या युवकांवर गाड्या विकण्याची वेळ आली आहे. येथील गाईडदेखील आर्थिक समस्येच्या गर्तेत सापडले आहेत. दोन वर्षे ऐन सिझनला कोरोना डोके वर काढत आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणारे सर्व व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही छोट्या व्यावसायिकांनी दहा टक्क्यांनी पैसे घेऊन संसार चालविला आहे. त्यामुळे दहा टक्के व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांनी आपला मोर्चा शाहूवाडीकडे वळविला आहे. दोन वर्षांत कोरोना व लॉकडाऊनमुळे सुमारे हॉटेल व रिसॉर्टधारक, छोटे व्यावसायिक यांचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकाला झळ बसली आहे. दोन वर्षांत कोरोनामुळे रिसॉर्टधारकांना मोठा आर्थिक फटका बसून व्यवसाय ठप्प आहे.
महेश पाटील आंबा
रिसॉर्ट माल.