लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेला आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन उद्या सोमवार (दि. २४) पासून शिथील करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे राज्य शासनाच्या नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ यावेळेत भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा सुरू राहतील दिवसभर मात्र पूर्णत: लॉकडाऊन असेल. अटी शर्तींनुसार व्यापार व उद्योगदेखील सुरू करता येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी रात्री याबाबतचे आदेश काढले.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा उच्चांक असून बाधीतांची संख्या दीड हजारावर तर रोजच्या मृत्यूचे प्रमाण सरासरी ५० ते ६० होते, त्यामुळे जिल्ह्यातील तीनही मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत १५ ते २३ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज रविवारी रात्री १२ वाजता या लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन शिथील करत असल्याचा आदेश काढला.गेल्या आठ दिवसात केवळ घरपोच दुध व भाजीविक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती. किराणा मालाची दुकाने यासह अत्यावश्यक सेवेत येणारे अन्य व्यवसायदेखील बंद ठेवण्यात आले होते. सध्या राज्यातदेखील लॉकडाऊन सुरू असून त्या नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ यावेळेत दुध, भाजीपाला, किराणा माल अशा अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कडकडीत बंद ठेवले जाते. हाच नियम सोमवारपासून कोल्हापूरसाठीदेखील लागू असेल. नागरिक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडू शकतील.
आज उडणार झुंबड
गेले आठ दिवस कोल्हापूरकर घरात बंदिस्त असल्याने सोमवारी सकाळी मात्र शहरात लोकांची झुंबड उडणार आहे. सध्या लोकांना फक्त दुध मिळत आहे. लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात येता येत नसल्याने लोकांना भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे. किराणा दुकानेदेखील बंद असल्याने संपलेल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता आहे.