कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशीही कोल्हापूर शहर बंदच राहिले. अत्यावश्यक सेवेतील तसेच वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडलेले काही नागरिक वगळता शहरातील सर्व रस्त्यांवर कमालीची शांतता होती. शुक्रवारपासून काही ठिकाणी भाजी विक्री सुरू झाल्याचे पहायला मिळाले.
शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन सुरू आहे. सर्व जनता घरात बसली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचारी वगळता अन्य कोणीही घराबाहेर पडलेले नाही. भाजी विक्रेत्यांनाच घरोघरी जाऊन भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे; परंतु गेल्या चार दिवसात भाजी विक्रेतेही कुठे बाहेर पडले नव्हते; परंतु या दोन दिवसात काही विक्रेते भाजी घेऊन थेट प्रभागात जाऊन विक्री करत आहेत. लॉकडाऊन आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातून कोणी भाजी घेऊन कोल्हापूर शहरात येण्याच्या फंदात पडले नव्हते.
शहरातील काही भागात विक्रेत्यांनी ॲाटोरिक्षा, हौदारिक्षा, मोटारसायकलवरून भाजी नेऊन ती नागरिकांच्या दारात विक्री करण्याचा प्रयत्न केला. उपनगरात काही विक्रेते एकाच ठिकाणी बसून भाजी विकताना दिसले. कडकडीत लॉकडाऊन सुरू होऊन सहाच दिवस झाले असल्यामुळे नागरिकांना फारशा काही गैरसोयी जाणवल्या नाहीत.
दवाखान्यात निघालोय, असे सांगत घराबाहेर पडणारे नागरिक रस्त्यावर येत आहेत; पण चौकाचौकात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस त्यांना अडवून त्यांची चौकशी करतात. खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या जवळच्या नातेवाइकांना ओळखपत्रे दिली आहेत. पोलिसांनी अडविले की, ती दाखविली जात आहेत.
-भटक्या श्वानांना कार्यकर्त्यांचा आधार -
शहरात हजारांच्या वर भटके श्वान आहेत. विविध ठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, हॉटेल या ठिकाणी या श्वानांना हमखास खायला मिळत असते; परंतु गेल्या महिन्याभरापासून खाद्यपदार्थांच्या गाड्या, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे अशा श्वानांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. भटक्या श्वानांच्या उपाशी पोटांची जाणीव झालेल्या शहरातील काही कार्यकर्त्यांनी रोज सकाळी, संध्याकाळी ब्रेड, बटर, बिस्किटे, चपाती असे पदार्थ या श्वानांना देण्यास सुरुवात केली आहे. श्वानांनाही आता त्याची सवय होत आहे. त्यामुळे एखादे वाहन आले की त्याच्याजवळ जातात.